धुळे। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकर्यांना सिंचन विहीरी मंजूर झाल्या असून या विहीरींच्या कार्यादेशात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार शिवसेनेने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देवून केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, धुळे तालुक्यातील शेतकर्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीरी मंजूर झाल्या आहेत. मात्र त्याचे कार्यादेश देताना पंचायत समितीतील अधिकारी व दलाल पैशांची मागणी करीत असल्याची शेतकर्यांची तक्रार आहे. त्यामुळे मंजूर 2800 विहीरींपैकी अद्यापही 600 ते 700 विहीरींचे कार्यादेश बाकी आहेत.
शेतकर्यांची अडवणूक करुन कार्यादेशामागे पैशांची मागणी
वास्तविक एप्रिल आणि मे महिन्याच्या आत या सिंचन विहीरींचे काम झाल्यास पावसाळ्यात या विहीरीत पाणी साचून त्याचा लाभ शेतकर्यांना मिळणार आहे. मात्र पंचायत समितीत शेतकर्यांची अडवणूक करुन कार्यादेशामागे दहा ते बारा हजार रुपयांची मागणी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. चौकशी करुन दोषी असलेल्यांवर कारवाई करावी व पात्र शेतकर्यांना मंजूर झालेल्या विहिरींचे तात्काळ कार्यादेश प्रदान करावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, कैलास पाटील, अरुण धुमाळ, देवराम माळी, भिकनसिंग राजपूत, मंगलसिंग गिरासे, सुनील चौधरी, विलास चौधरी,अॅड.राजेंद्र वाघ, प्रविण पाटील, चंद्रकांत म्हस्के, मुकेश खरात, विलास धनगर, दत्तात्रय सरग, संदीप सूर्यवंशी, दिनेश पाटील, निलेश खेडकर, अरूण माळी, सुधाकर पाटील, किशोर आढावे, समाधान मराठे, प्रकाश गुरव आदी उपस्थित होते.