भुसावळ। मान्सूनपूर्व नाले गटारींची स्वच्छता पालिकेने अद्यापही सुरु केलेली नाही. त्यामुळे सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांनी 7 हजार रुपयांची लोकवर्गणी करुन नालेसफाईच्या कामाला सुरवात केली. गेल्या दोन दिवसांत तीन ट्रॅक्टर रेतीगाळ काढण्यात आला असून उर्वरित दोन दिवसांत आणखी तीन ते चार ट्रॅक्टर रेतीगाळ काढला जाणार आहे.
सिंधी कॉलनीत नाल्यांचा प्रश्न गंभीर आहे. नाले तुंबल्याने काही खोलगट भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार वाढतात. मान्सूनपूर्व नाले गटारींची स्वच्छता करण्यासाठी पालिकेने नियोजन केले. त्याबाबतचा ठराव देखील केला. मात्र अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. यामुळे सिंधी कॉलनीतील भाई आनंदराम धाम दरबार परिसरात एलपट्टा परिसरात गटारींची स्वच्छता लोकवर्गणीतून करण्यात आली. नगरसेवक रमेश नागराणी, अजय नागराणी, अप्पू तेजवानी, नवीन शामनानी, मनिष शबानी पैसे जमवून स्वच्छता केली.