पिंपरी-चिंचवड : तब्बल 40 दिवसांच्या कडक उपवासानंतर गुरुवारी सिंधी बांधवांच्या चालिहो उत्सवाची सांगता झाली. या उत्सवानिमित्त पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेतून नदीकाठावरील झुलेलाल मंदिरापर्यंत सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आल्या. याप्रसंगी कणकेचा पंचमुखी दिवा म्हणजेच ‘बैराना’ नदीमध्ये सोडण्यात आला. शोभायात्रांमध्ये विविध वेशभूषा केलेले सिंधी भाविक, ढोल पथके, वारकरी पथकही सहभागी झाले होते. यावेळी काही भाविकांनी अन्नदान केले. पिंपरीच्या जुलेला घाटावर शेकडो दीपज्योती पवना नदीपात्रात सोडण्यात आल्या. चालिहो या शोभायात्रेत सर्व सिंधी बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
ज्योतीचे मनोभावे दर्शन
बाबा झुलेलाल यांची पालखीही मुख्य बाजारपेठेतील मंदिरातून काढण्यात आली. यावेळी सर्वात पुढे बाबा झुलेलाल मंदिरात प्रज्ज्वलित करण्यात आलेली ज्योत होती. भाविक या ज्योतीचे दर्शन घेतात व मनोकामना व्यक्त करतात. ही शोभायात्रा संपूर्ण पिंपरी परिसरात फिरून नदीकाठावरील बाबा झुलेलाल मंदिराजवळ आल्यानंतर शोभायात्रेचे विसर्जन झाले. त्यानंतर महिलांनी नदीपात्रात बैराना सोडला.
उपवास शनिवारी सुटणार
सिंधी समाजाचे आराध्यदैवत बाबा झुलेलाल यांनी एक हजार 65 वर्षांपूर्वी सिंधी समाज बांधवांना विश्वशांती, बंधुभाव यांचा संदेश दिला. सर्वांनी एकोप्याने समाजात रहावे, सलोखा वाढावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची शिकवण बाबा झुलेलाल यांनी त्यावेळी दिली होती. चालिहो साहेब हा उत्सव सिंधी बांधव दरवर्षी 40 दिवस साजरा करतात. या 40 दिवसात उपवास केले जातात. त्याशिवाय या काळात आपण केलेल्या पापांची कबुलीही दिली जाते. या काळात मांसाहार, मद्यप्राशन केले जात नाही. यावर्षी 40 व्या दिवशी उत्सवाची सांगता झाली असली तरी उपवास मात्र, तिथीनुसार शनिवारी (दि. 26) सोडण्यात येणार आहे.