टोकियो । रविवारी कोरियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकणार्या भारताच्या पी व्ही. सिंधूचे आता सर्व लक्ष्य मंगळवारपासून पात्रता फेरीच्या लढतींनी सरू होणार्या जपान ओपन सुपर सीरिज स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याकडे असेल. या स्पर्धेत सिंधूसह किदम्बी श्रीकांत आणि सायना नेहवालचेही आव्हान असणार आहे. कोरियन ओपन स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतरही नंतरच्या लढतीत सिंधूने मिनात्सु मितानीला हरवले होते. जपान ओपन स्पर्धेतही पहिल्या फेरीत सिंधूची लढत मितानीशी होणार आहे. हैदरबादच्या 22 वर्षीय सिंधूने जागतिक स्पर्धेतील पराभवाची परतफेड करताना कोरियात जपानच्या नोझोमी ओकुहाराला हरवले होते. या हंगामातील या दुसर्या महत्वाच्या विजेतेपदानंतर सिंधूचा सलग तिसर्या स्पर्धेत विश्वविजेत्या ओकुहाराशी सामना होऊ शकतो. पण त्यासाठी सिंधूने मितानीला आणि ओकुहाराने हाँगकाँगच्या चेयूंग एनगॉनला हरवावे लागेल.
जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतसमोर पहिल्या फेरीत चीनच्या 10 व्या स्थानावर असलेल्या तियान होऊवेईशी होईल. इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमिअर आणि ऑस्ट्रेलिया सुपर सीरिज स्पर्धा जिंकणार्या श्रीकांतने सिंगापूर ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. श्रीकांत आणि होऊवेई याआधी सातवेळा एकमेकांशी भिडले आहेत. त्यात सहावेळा होऊवेईने बाजी मारली आहे. या सहा लढतींपैकी पाच सामन्यांचा निकाल तिसर्या गेमपर्यंत लांबला होता. ग्लासगो जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणार्या सायनाच्या पायाचे स्नायू दुखावले होते. थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवाँगशी तिचा पहिल्या फेरीत सामना होणार आहे. सायनाने पॉर्नपोवीचा अंतिम सामन्यात पराभव करत मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. स्पर्धेत मानाकंन न मिळालेल्या सायनाचा पुढच्या फेरीत माजी विश्वविजेती आणि विद्यमान ऑलिम्पिक विजेती कॅरोलिना मरिनशी होऊ शकतो.