सिंधूताईंच्या पतीचे निधन

0

वर्धा । प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांची माय सिंधूताई सपकाळ यांचे पती हरबा सपकाळ यांचे शनिवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी सिंधुताई सपकाळ, मुले अमृत, अरुण, संजय, ममता, दीपक, श्याम, विनय यांच्यासह सुना, नातवंडे, अनाथ मुले-मुली असा परिवार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता सेलू तालुक्यातील माळेगाव ठेका या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी आणि सिंधूताई पुण्याहून रविवारी दाखल झाले. अंत्यसंस्काराला त्यांची तिन्ही मुले हजर होती. आपल्यामुळे सारे खोळंबू नयेत म्हणून सिंधूताई यांनी अंत्यसंस्कार करण्यास सांगितले होते. त्यानुसार अंत्यविधी करण्यात आले. सिंधूताई समाजसेवेसाठी घराबाहेर पडल्यापासून हरबा हे दोन मुलांसह सेलू तालुक्यातील माळेगाव ठेका येथे राहात होते. काही दिवस पुणे येथील सिंधूताईंच्या आश्रमातही राहिले. प्रकृती ढासळल्याने सावित्रीबाई फुले वसतिगृहातील मुलगा अरुण यांच्याकडे वास्तव्यास होते.

दुसरा अंक संपला
आज माझे सगळ्यात मोठे खतरनाक बाळ (पती) देवाघरी गेले आणि आयुष्याचा दुसरा अंक संपला. आता शेवटची तिसरी घंटा ऐकू येत आहे,’ अशी प्रतिक्रिया सिंधूताई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी सिंधुताई, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हरबा सकपाळ यांचा मोठा मुलगा अमृत माळेगाव ठेका येथे, दुसरा चिखलदरा तर तिसरा मुलगा संजय वर्ध्याजवळील म्हसळा येथे राहतो. तर मुलगी पुण्यात वास्तव्यास आहे.