सिंधू, सायना दुसर्‍या फेरीत

0

कॅाव्लून । भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालने चार लाख डॉलर्स पुरस्कार रकमेच्या हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत स्थान मिळवले. पुरुषांच्या एकेरीच्या लढतीत मात्र भारताच्या पदरी निराशा पडली. भारताचे पारुपल्ली कश्यप आणि सौरव वर्मा यांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती आणि जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या सिंधूने यजमानांच्या यूट यी लुंगचा 26 मिनिटे खेळल्या गेलेल्या सामन्यात 21-18, 21-10 असा पराभव केला. त्याआधी झालेल्या सामन्यात लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती सायना नेहवालने डेन्मार्कच्या मेट्टे पॉलसेनचा 21-19, 23-21 असा पराभव केला होता. दुसर्‍या फेरीत जागतिक अकरावे मानाकंन असलेल्या सायनाचा सामना आठवे मानाकंन मिळालेल्या चीनच्या चेन युफेईशी होईल. युफेईने ऑगस्ट महिन्यात ग्लासगोमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. पुरुषांच्या एकेरीच्या लढतींमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामधील विजेता पारुपल्ली कश्यपला कोरियाच्या ली डाँग कियूनने 15-21, 21-9, 22-20 असे हरवले, तर सौरभला इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोकडून 15-21, 8-21, असा पराभव पत्करावा लागला.