‘सिंहगड’च्या प्राध्यापकांना 14 महिन्यांपासून पगारच नाही!

0

पगारासाठी प्राध्यापकांचे असहकार आंदोलन

पुणे : सिंहगड कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगाराच्या मागणीसाठी सोमवार (दि. 18) पासून असहकार आंदोलन सुरु असून, मागील 14 महिन्यांपासून प्राध्यापकांना पगारच नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इमाने इतबारे अध्यापनाचे काम करणार्‍या प्राध्यापकांचे पगार हे 2012 सालापासून अडकविण्याचे प्रकार सुरु असून, ते आजपर्यंत कायम आहे. मागील 14 महिन्यांपासून प्राध्यापकांना पगार नसल्याने शिक्षकांनी संस्थेच्या आवारात असहकार कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

पगार मागितला तर कामावरून काढण्याची धमकी!
पगार मिळत नसल्याने प्राध्यापक कंगाल झाले आहेत. बँकांकडून, लोकांकडून घेतलेल्या कर्जाची त्यांना परतफेड करता येत नाही म्हणून घरातील दागिने, सोने-चांदी, गावाकडील जमीन, घर विकावे लागले आहे. मागील पाच वर्षांपासून प्राध्यापकांचे पगार अडकवून त्यांची पिळवणूक संस्था करत असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे. यापूर्वीसुद्धा विनंतवार्‍या करुनसुद्धा पगार होत नसल्याने प्राध्यापक हतबल झाले आहेत. तसेच जे वारंवार पगाराच्या पैशांची मागणी करतात त्यांना कामावरुन कमी करण्याची धमकी दिली जात आहे. अनेकांना आई, वडील, भाऊ यांच्या उपचारांसाठी पैसे लागत आहेत, म्हणून 14 नाही तर किमान 7 महिन्यांचा तरी पगार द्या, अशी मागणी केली तरीदेखील पगार मिळाला नाही, असे प्राध्यापकांनी सांगितले. अडविलेले पगार तातडीने करा तसेच पुढील पगार नियमित महिन्याच्या दहा तारखेला द्या, अशी मागणीही करण्यात आली आहे.