सिंहगड घाटाचे काम संथगतीने

0

पुणे । सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळल्यानंतर हा रस्ता दुरुस्तीसाठी आठ दिवस बंद करण्यात आला असला तरी सध्या हे काम इतके संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आणखी पंधरा दिवस तरी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान घाट रस्ता बंद असल्याने रविवारी गडावर येणार्‍या पर्यटकांची संख्या चांगलीच रोडावली होती.

हा घाट रस्ता दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. जिल्हाधिकार्‍यांनी सुद्धा हा रस्ता आठ दिवस बंद राहणार असल्याचे जाहीर केले. या घटनेला पंधरा दिवस झाल्यानंतरही या रस्त्यावर ज्या ठिकाणी दरड कोसळली होती. त्या दरडी हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम फक्त पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर पडलेले खड्डे मुरुम टाकून बुजविण्याचे काम सुरू आहे.

दरडींचा धोका कायम
प्रत्यक्षात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हाती घेऊन धोकादायक दरडी पाडून तसेच जेथून माती अथवा दगड घसरून पडू शकतात अशा ठिकाणी जाळी बसविण्याचे काम सुद्धा सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे जरी हा घाट रस्ता येत्या काही दिवसांत सुरू झाला तरी दरडी कोसळण्याचा धोका कायम राहणार आहे. त्यामुळे हे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याची गरज आहे. त्याचबरोबर सध्या जे काम सुरू आहे, ते वनसमितीच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम तातडीने करावे अशी मागणी होत आहे.

पर्यटकांची संख्या रोडावली
दरम्यान घाट रस्ता बंद असल्याने पायी जाणार्‍या पर्यटकांची गर्दी होती पण ती संख्या कमी होती. साधारणत; दर रविवारी गडावर सकाळी चढून जाणारे असे तीन ते चार हजार पर्यटक असतात. तेवढेच पर्यटक रविवारी गडावर होते. सिंहगडावर जरी पर्यटकांची गर्दी कमी असली तरी खडकवासला धरणाच्या चौपाटीवर मात्र गर्दी वाढली होती. अरुंद रस्ता आणि त्यातच वाहनांची मोठी संख्या यामुळे रांगा लागल्या होत्या. वाहतुकीच्या नियोजनासाठी पोलिससुद्धा तैनात करण्यात आले होते.