सिंहगड घाट रस्त्याकडे दुर्लक्ष

0

कात्रज । सध्या सिंहगडकडे जाणारा पुणे-खडकवासला रस्ता दरड कोसळल्याने बंद आहे. त्यामुळे अनेक पर्यटक खेड शिवापूर-कोंढणपूरमार्गे अवसरवाडी घाटमार्गे गडावर जाण्यासाठी या मार्गाचा वापर करीत आहेत; परंतु या मार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनखाते यांच्या वादामुळे रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर निधीही परत गेला आहे. तसेच या रस्त्याच्या दुरुस्ती कामी आमदार भीमराव तापकीर, जिल्हा परिषद सदस्या पूजा पारगे, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव यांनी या रस्त्याच्या कामी लक्ष घालणे गरजेचे असताना ते या कामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण ओव्हाळ यांनी
केला आहे.

कोंढणपूरमार्गे जाणार्‍या अवसरवाडी सिंहगड घाट रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज पसरले असून संतप्त नागरिकांनी आणि पर्यटकांनी या ठिकाणी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. सिंहगड रस्त्यावर 30 जुलैला दरड कोसळली होती. त्यानंतर वनविभागाकडून सिंहगडाकडे जाणारा रस्ता आठ दिवसांसाठी बंद केला असल्याचे घोषित केले होते. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत शिक्कामोर्तबही केले होते.

खड्ड्यांमुळे स्थानिकांसह पर्यटक त्रस्त
त्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी खेड शिवापूर-कोंढणपूर येथून अवसरवाडी घाटमार्गे रस्ता असून, अनेक पर्यटक या मार्गाने सध्या ये-जा करीत असतात. सुट्यांमुळे गडावर जाण्यासाठी अनेक पर्यटकांनी या मार्गाचा वापर केला; परंतु या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे स्थानिकांसह पर्यटक त्रस्त झाले. या मार्गाने जाणारे पर्यटक आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण ओहाळ यांनी पुढाकार घेऊन कार्यकर्ते आणि पर्यटक यांच्या समवेत प्रशासनाचा निषेध करीत या मार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण केले. यावेळी कार्यकर्ते प्रदीप वैराट, गणेश देवकर, सुनील रोकडे, तसेच पर्यटक उपस्थित होते. दरम्यान या घाट रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी ओव्हाळ यांच्यासह पर्यटकांनी केली आहे.