पुणे : सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या सिंहगड रस्ता, हडपसर, पुणे-मुंबई रस्ता या ठिकाणी असलेल्या कार्यालयांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी छापे घातले. त्यात सीबीआयला काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात येते. संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांच्या घराचीही सीबीआयने झडती घेतली.
नवले यांनी सेंट्रल बँकेकडून कर्जाऊ घेतलेले 75 कोटी रुपये बेकायदेशीररित्या अन्यत्र वर्ग करून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने बँकेचे तत्कालीन सहायक सरव्यवस्थापक, नवले व इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नर्हे येथे डेंटल हॉस्पिटलची बांधणी करणे, अन्य कॅम्पसमध्येही बांधकामे आदी बाबींसाठी नवले यांनी बँकेकडे कर्ज मागितले होते. त्यासाठी त्यांनी बँकेला बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच, बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनीही संबंधित कामांसाठठा पैसे खर्च होत असल्याची कोणतीही शहानिशा केली नाही. त्यामुळे नवले यांनी हे पैसे अन्यत्र वळवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शहरातील सिंहगड रस्ता, हडपसर आणि मुंबई-पुणे रस्त्यावरील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कार्यालयांवर सीबीआयने छापे टाकले. या कार्यालयांमधून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे. नवले यांच्या घराचीही झडती घेण्यात येत असून, या प्रकरणात सीबीआयचे अधिकारी आणखी तपास करत आहेत.