सिंहगड रस्त्यावर कुणी मरण्याची वाट पाहताय का?

0

मुंबई (निलेश झालटे) : राज्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ आणि ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील दरडी कोसळत असून तरीही या रस्त्याचे काम होत नसल्याबाबत विरोधकांकडून विधानसभेत संताप व्यक्त केला. अद्याप या रस्त्यावर कुणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली असता रोज या रस्त्यावर दरडी कोसळत असून सरकार कुणाच्या मरणाची वाट पाहत आहे का? कुणी मेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही का? असा खडा सवाल राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी केला. विधानसभेत पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील दरडींबाबत भाजप आमदार बाबूराव पाचर्णे यांनी उपस्थित केला. त्यावरून चर्चेत विधानसभेत विरोध – सत्ताधारी आमदारांमध्ये खडाजंगी झाली. याप्रश्नावरून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. शेवटी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्च 2018 पर्यंत सदर रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन देत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यासाठी अजित पवारांचा संताप
सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी रस्त्यावर दरडी कोसळत असून कुठल्याही क्षणी अपघात होऊ शकतो. याबाबत रस्ता कधी दुरुस्त करणार व दरडी संरक्षित करण्याबाबत काही नियोजन केलेय का? असा सवाल पाचर्णे यांनी केला असता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे – पाटील यांनी सिंहगड रस्त्याबाबत आयआयटी पवई कडुन सर्वेक्षण अहवाल मिळाल्यानंतर कामाला सुरवात केलीआहे. दरड कोसळल्यामुळे अद्यापर्यंत येथे कोणीही मृत्युमुखी पडले नाही. या उत्तराला हरकत घेत आक्रमक होत अजित पवार यांनी दर शनिवार आणि रविवारी हजारो पर्यटक सिंहगड किल्ल्यावर येतात. पावसाळ्यामध्ये दरड, मुरूम, मातीमुळे निसरडा रस्त्यामुळे धोका निर्माण होत आहे. घाटकोपर दुर्घटनेसारखी कोणीतरी मृत्युमुखी पडण्याची वाट पाहायची काय? मंत्र्यांनी जबाबदारीने उत्तरे द्यावी अशा शब्दात संताप व्यक्त केला.

वनविभागाच्या हरकतीचा प्रश्नच नाही
पतंगराव कदम यांनी आमच्या कार्यकाळात सिंहगड किल्ल्यासह राज्यातील किल्ल्यांच्या रस्त्यांसंदर्भात वन आणि पर्यटन विभागाचा सामंजस्य करार झालेला आहे. सिंहगड किल्ला रस्त्यासाठी १० कोटी रुपये तरतुद केली आहे. फक्त पाच कोटी म्हणजे ‘लॉलीपॉप’ होईल. ना हरकत सुद्धा दिलेली आहे, राज्यमंत्री पोटे खोटी उत्तरे देत आहेत, वस्तुस्थिती वेगळी आहे असा आरोप केला. यावर राज्यमंत्री पोटे यांनी हा रस्ता वन विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे परवानगीची अडचण आली असल्याचे सांगितले. त्यावर भाजप आमदार विजय काळे यांनी हरकत घेतली. काळे यांनी या रस्त्याला वन विभागानेच निधी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीची अडचण कशी काय असू शकेल? वन विभागाने वाहतुककोंडी होत नाही, असे खोटे लेखी उत्तर दिले आहे. वनविभागाने किती निधी दिला, खर्च किती केला याची सत्य माहिती द्यावी, असे काळे यांनी सांगितले.

चंद्रकांत दादांनी केली सारवासारव
यानंतर राज्यमंत्री पाटील गोंधळून गेल्याने परत संतापलेल्या अजित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून वनमंत्री मुनगंटीवार गैरहजर आहेत. चंद्रकांत दादा तुम्ही काहीच बोलत नाही. राज्यमंत्री खोटी माहिती देत आहेत. माळशेजच्या धर्तीवर सिंहगड रस्त्याचे काम तातडीने करा अशी मागणी केली. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवीदा प्रक्रिया, १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी, ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची कामे झाले आहेत. मार्चपुर्वी सिंहगड घाट रस्त्याचे काम पुर्ण केले जाईल असे आश्वासन देत गोंधळ थांबविला.