भाजपच्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर भाजपचा विराट मेळावा झाला. त्यानंतर अमित शहा यांची पत्रकार परिषद झाली. या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या विधानांद्वारे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी युती करण्यास भाजप इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप मेळाव्यातील भाषणात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख केला. भाजपला वाढवण्यात योगदान देणार्या नेत्यांची नावे घेतल्यानंतर आपल्या पक्षाचे नेते नसले, तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपच्या साथीने प्रचार केला, त्याचबरोबर महाराष्ट्र धर्म वाढवण्यात योगदान दिले, असे विधान करत फडणवीस यांनी शिवसेनेशी युती करण्यास भाजप उत्सुक असल्याचे स्पष्ट केले. भाजपचा महामेळाव्यात शक्तिप्रदर्शन करण्याचा मानस यशस्वी झाला आहे. जवळपास 50 कोटी रुपयांचा चुराडा करून भाजपने आपला महामेळावा यशस्वी केला आहे. मेळाव्यातून पुढील निवडणुकांची रणनीती आणि त्यांचे राजकीय धोरण स्पष्ट झाले आहे.
अमित शहा यांनी शिवसेनेची सोबत कायम राहावी, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली, तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर खालच्या भाषेत टीका करणार्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेत त्यांना कोठडीत डांबण्याचा इशाराही दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यास विसरले नाहीत. शिवाय आरक्षणाच्या मुद्द्याचे स्पष्टीकरण भाजपने केले आहे. शहा आणि फडणवीस यांनी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि कोणाला लावूनही देणार नाही, असे ठासून सांगितले आहे. सत्तेच्या शिकारीसाठी सर्व लांडगे एकत्र येत आहेत, पण भाजप ही सिंहाची पार्टी असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे भविष्यात दंगली घडवतील. सत्तेकरता बुद्धीभेद करतील. माणसा-माणसांत लढाई लावतील. समाजात तेढ निर्माण करतील. पण भाजपची सामाजिक न्यायाची भूमिका पक्की आहे. आमचे म्हणणे स्पष्ट आहे, संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी एससी, एसटी आणि ओबीसींचें आरक्षण कोणीच हिरावणार नाही. ते आरक्षण ही भाजपची भूमिका आहे. पण काहीही झाले तरी या लांडग्यांना सत्तेत येऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपचे धोरण स्पष्ट सकेले आहे, तर शिवसेनेने भाजपसोबतच राहावे, ही आमची इच्छा आहेच असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. मुंबईत भाजपचा महामेळावा पार पडला. त्यानंतर अमित शहा यांना शिवसेनेबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे. आरक्षणावरही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात खुलासा केला. कोणालाही आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असे ते म्हणाले.
आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचा आणि नावाचा वापर भाजप करणार हेही कालच्या मेळाव्याने स्पष्ट केले. व्यासपीठावर दिसणार्या दोन पुतळ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या सुरुवातीनेच ते स्पष्ट केले आहे. शिवाय भाजप हा भटा बामणांचा पक्ष हा ठपका पुसण्याचाही भाजपचा प्रत्न आहे, त्याची झलक मेळाव्याची गर्दी आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात दिसली. अटलजी विकास पुरुष, आडवाणी लोहपुरुष आणि नरेंद्र मोदी युगपुरुष हे मुख्यमंत्र्यांचे वाक्य फार बोलके होते. मोदी हाच भाजपचा पुढील निवडणुकीचा चेहरा असणार हे यातून स्पष्ट झाले आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आगामी निवडणुका लढवायच्या हा भाजपचा अजेंडा आहे. त्याची झलक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही भाषणात दिसली. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर सिंचनक्षेत्र वाढवावे लागेल ते आम्ही 40 टक्क्यांच्या वर घेऊन जाऊ, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. जे प्रकल्प बंद पडलेत ते एक वर्षात पूर्ण करू. सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करू. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या होणार नाही. महाराष्ट्रात 1 लाख कोटी रुपये सिंचनासाठी दिलेत, असे त्यांनी सांगितले. शिवाय पुढची 20-30 वर्षे खड्डे न पडणारे असे महाराष्ट्रभर सिमेंट रस्ते दिसतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षांतर्गत नाराजींना दूर करण्याचा प्रयत्नही भाजप करत असल्याचे चित्र आहे. त्याची झलकही काल दिसली. मंत्रिमंडळातून बाहेर जावे लागलेल्या एकनाथ खडसे यांना चुचकारण्याच्या प्रयत्न म्हणून मेळाव्याच्या ठिकाणी लावलेल्या आणि अमित शहा यांचे स्वागत करणार्या काही पोस्टरवर एकनाथ खडसे यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. शिवाय, व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि खडसेंत हास्यविनोदही पाहायला मिळाला.
आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो भाजपवर सतत आगपाखड करणार्या शिवसेनेचा. भाजपने सेनेला गोंजारायला सुरुवात केली आहे. शिवसेनेला गांडूळ म्हणणार्या अजित पवारांचा समाचार भाजपच्या व्यासपीठावरून घेण्यात आला. भाजपच्या महामेळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधत अजित पवार, भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, असा थेट इशारा दिला. शिवसेनेला गांडूळ म्हणता तुम्ही तर राज्याला लागलेली वाळवी आहात, असे ते म्हणाले. भाजपने शिवसेनेला सत्तेवर आल्यापासून 4 वर्षे लाथाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता भाजपला आताच शिवसेनेची गरज का भासते आहे? त्याची काही व्यावहारिक कारणे आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीतील अपयश आणि एनडीएतील वाढती नाराजीमुळे अस्वस्थ असलेल्या भाजपसमोर आगामी निवडणुकीत संघटित झालेल्या विरोधकांचे कडवे आव्हान असेल. या पार्श्वभूमीवर टीडीपीप्रमाणे सेनेला दुखावण्याचा धोका पत्करायचा नाही. म्हणून भाजपकडून या मित्रपक्षाला गोंजारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भाजपला देशभरातील विविध पोटनिवडणुकीत अपयश आले आहे. देशात 6 जागी त्यांचा पराभव झाला. आता खासदार जीवा पांडू गावित यांच्या निधनामुळे आणि नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकत पुन्हा काँग्रेस पक्षाचा रस्ता धरल्याने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. लोकसभेतही चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष सत्तेतून बाहेर पडल्यामुळे भाजप आघाडीचे संख्याबळ बहुमतापासून 2 जागांनी खाली आले आहे. त्यांचे संख्याबळ 282 वरून 274 वर घसरले आहे. बहुमतासाठी 276 सदस्यांची गरज आहे. हा आकडा भरून काढताना उरलेल्या कोणत्याही पक्षाला भाजप दुखावू शकत नाही. त्यात शिवसेनेचे 18 खासदार आहेत. ते जर बाहेर पडले तर हे भगदाड भरणे भाजपला शक्य होणार नाही. महाराष्ट्रात मराठा, धनगर आदी जातीय आरक्षणासाठी पेटलेला आरक्षणाच्या आंदोलनांचा अंगार अजून विझलेला नाही, दलितांच्या भावना दुखावणार्या कोरेगाव भीमा दंगलीच्या जखमा अजून ओल्या आहेत. बेरोजगारी, महागाईने युवक आणि सामान्य नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरीराजा नाराज आहे. कर्जमाफी घोषणेनंतरही अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. अजून त्यांच्या खात्यात काही पडलेले नाही. त्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. गारपीट, बोंडअळी, विम्याची मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही त्याचा रोष शेतकर्यांमध्ये आहे. या सार्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी भाजपने आपली रणनीती आखली आहे.
तसा शिवसेना भाजपमधील संघर्ष आज नवा नाही. शेलार आणि खासदार किरीट सोमय्यांपेक्षाही खालच्या स्तराला जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे शिवसेनेवर तुटून पडायचे. मग सेना-भाजपची फाटलेली गोधडी शिवायला केंद्रातून लालकृष्ण आडवाणी आणि दिवंगत प्रमोद महाजन यायचे. अशाच एका समेटाच्या बैठकीचा अनुभव मी स्वतः विमानतळासमोरच्या तत्कालीन सेन्टॉर हॉटेल येथे डोळ्याने घेतला आहे. भाजपच्या सिंहांनी म्हणूनच शिवसेनेच्या वाघांना टाळी देण्यासाठी हात पुढे केला आहे. वाघ याच्यावर कसा रिअॅक्ट होतो, हे आता महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरेंसमोर दोन अडचणी आहेत. एक तर त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकला चलो रेचा ठराव करण्यात आला आहे तो मोडीत काढावा लागेल आणि दुसरे म्हणजे तत्त्वांचा मुद्दा. आता जे मुद्दे घेऊन सेनेचे वाघ भाजपविरोधात डरकाळ्या फोडतात त्याला ते काय ऑर्ग्युमेन्ट देणार, हे ठरवावे लागेल. तडजोडीच्या भूमिकेने सेना पुढे सरकेलही. कारण राजकारणाच्या सारीपाटावर सेना जिंकली, हे खरं आहे, पण तहनाम्यात त्यांना जिंकता आले पाहिजे.
दोन पावले मागे सरकले…
भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महामेळाव्यात आपली दिशा शुक्रवारी स्पष्ट केली आहे. भाजपने जिंकण्याच्या रणनीतीसाठी दोन पावले मागे सरकण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांपासून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांपर्यंत गेल्या चार वर्षांत प्रत्येकच मेळाव्यात शत-प्रतिशतची हाक दिली जात होती. मात्र, आता भाजपने थोडी नरमाईची भूमिका घेत शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला. पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट झाले आहे.
– राजा अदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111