सिक्कीममधून पवनकुमार चामलिंग सरकार पायउतार; मुख्यमंत्रीपदी प्रेमसिंह तमांग

0

गंगटोक:सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम) चे अध्यक्ष प्रेमसिंह तमांग उर्फ पीएस गोले यांची सिक्कीमच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडून आज सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी एसकेएमच्या ११ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. वास्तविक गोले यांनी निवडणूक न लढवल्यामुळे ते सध्या राज्य विधानसभेचे सदस्य नाहीत. मात्र एसकेएमचे विधानमंडळ पक्ष नेते म्हणून त्यांची शनिवारी निवड करण्यात आली होती.

२०१३ मध्ये निर्माण झालेल्या ‘एसकेएम’ने ३२ सदस्य असलेल्या सिक्कीम विधानसभेत १७ जागांवर विजय मिळवत, स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तर ‘एसडीएफ’ला १५ जागा मिळाल्या. एसकेएमने २४ वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत राहिलेल्या चामलिंग सरकारला सत्तेतून खाली खेचले. चामलिंग यांच्या एसडीएफ पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेल्या तमांग यांनी माजी मुख्यमंत्र्याविरोधात बंड करत २०१३ मध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाची स्थापना केली होती. यानंतर २०१४ मधील विधानसभा निवडणुकात त्यांच्या पक्षाला १० जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी एसडीएफ वर भ्रष्टाचार व बेजबाबदार सरकार असल्याचे आरोप केले होते. माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग व सिक्कीम डेमोक्रेटीक फ्रंट (एसडीएफ) चे वरिष्ठ नेते मात्र या शपथविधी सोहळ्यास गैरहजर होते.