गंगटोक: सिक्किममधील भारत-चीन सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्याचे जवान आमने-सामने आले. यावेळी दोन्हीकडील सैनिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. नंतर स्थानिक पातळीवरील चर्चेनंतर सैन्य मागे घेण्यात आले.
लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीम येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला. यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांना किरकोळ दुखापत झाली. या संघर्षादरम्यान, भारतीय आणि चिनी सैनिक आक्रमक झाले होत. यामुळे काहीजण जखमी झाले आहेत. चीनचे सैन्य लडाख ते अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर सतत फिरत असते. डोकलाम मुद्दाही दोन्ही देशांदरम्यान बराच काळ धुमसत राहिलेला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सीमेबाबतच्या वादामुळे अशा घटना भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अधूनमधून घडत असतात. अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर दोन्ही बाजूचे लष्कर प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार निर्माण झालेली समस्या सोडवतात.