सिग्नलची केबल चोरणार्‍यास सुनावली न्यायालयीन कोठडी

0

जळगाव । शिवाजी नगरातील रेल्वे क्वॉर्टरमध्ये 12 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजता दोन चोरट्यांनी वॉचमनशी झटापट करुन सिग्नलची सुमारे 6 लाख रुपये किमतीची केबल चोरली. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन संशयिताना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यांना न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पश्चिम रेल्वे लाईनवर दोन नवीन रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. सिग्नल यंत्रणेसाठी लागणारे साहित्य शिवाजी नगरातील रेल्वे क्वार्टरमधील गोदामात ठेवण्यात आले आहे. 12 फेब्रुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी वॉचमनला मारहाण करून सिग्नलची केबल चोरून नेली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी संदीप ठोके, लक्ष्या उर्फ लक्ष्मण अशोक भदाणे यांना रविवारी अटक केली. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यांना न्या.पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.