‘सिग्नल’ सुसूत्रीकरणात अनेक अडथळे!

0
पुणे : शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या वीस मार्गाचे सर्वेक्षण करून या मार्गावरील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे (सिग्नल) सुसूत्रीकरण (सिंक्रोनायझेशन) करण्यात येईल, असे स्मार्ट सिटी आणि वाहतूक पोलिसांकडून जाहीर करण्यात आले असले तरी सुसूत्रीकरणाच्या मार्गात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्यावरील सिग्नलची अपुरी संख्या, प्रत्येक सिग्नलच्या वेगवेगळ्या वेळा, मार्गावरील वाहतुकीनुसार सिग्नलच्या कमी-अधिक कराव्या लागणार्‍या वेळा आणि सिग्नल पुरविणार्‍या भिन्न कंपन्या यामुळे वीस मार्गातील सिग्नलचे सुसूत्रीकरण करण्याच्या प्रकल्पाला अनेक मर्यादा येण्याची शक्यता आहे.
घड्याळांचा अभाव आणि नादुरुस्त
शहरातील खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र सिग्नल उभारणीसंदर्भात महापालिकेचे कोणतेही ठोस धोरण नसल्यामुळे शहरात सिग्नलची आवश्यकता कुठे आहे, कोणत्या दिशेला तो असावा, सिग्नलचे सुसूत्रीकरण कशा पद्धतीने करावे या माहितीचा तसेच सिग्नल यंत्रणेतील उलटगणती घड्याळांचा अभाव आणि नादुरुस्त घड्याळे यामुळे शहरातील वाहतूककोंडीत भर पडत आहे.
चार महिन्यात यंत्रणा कार्यान्वित
सिग्नलच्या सुसूत्रीकरणासाठी एटीएमएस यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. सध्याच्या प्रस्तावानुसार सिग्लनचे सुसूत्रीकरण करण्यास तांत्रिक अडचणी येण्याची निश्‍चित शक्यता आहे. त्यामुळेच सिग्नलशी संबंधित महापालिका, विद्युत विभाग, पोलीस आणि ठेकेदार कंपन्यांना बरोबर घेऊन नियोजन सुरू करण्यात आले आहे. एटीएमएस यंत्रणेची अंमलबजावणी होईपर्यंतचा हा पर्याय आहे. डिसेंबर महिन्यात एटीएमएस यंत्रणेची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे सिग्नलच्या सुसूत्रीकरणाचा मार्गही मोकळा होईल, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.
वीस मार्गाचे सर्वेक्षण
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूककोंडीचे प्रमाण कमी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका, स्मार्ट सिटी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्त प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत स्मार्ट सिटीकडून वाहतूक पोलिसांना वीस मार्गाचे सर्वेक्षण करण्याबाबत सांगण्यात आले होते. रस्त्यावरील चौकांची संख्या, वाहतूककोंडी होण्याची ठिकाणे, सिग्नलचा कालावधी यांचा प्राथमिक अभ्यास करून सिग्नलचे सुसूत्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
कात्रज-बोपोडी, कर्वे पुतळा-पुणे स्टेशन, पुणे स्टेशन-खराडी दर्गाह, मगरपट्टा- खराडी बायपास, बोपोडी-पुणे स्थानक जुना महामार्ग, विश्रांतवाडी-सादलबाबा ते पाटील इस्टेट ते शिवाजीनगर, खंडुजीबाबा चौक-स्वारगेट, सायकर चौक-कॅम्प, 509 चौक-आरटीओ ते मनपा, रेंजहिल्स-विमानतळ, नांदेड सिटी-स्वारगेट, महापालिका भवन-ब्रेमेन चौक, खान्या मारुती-खडी मशीन, महेश सोसायटी-जेधे चौक, बोपोडी-हडपसर, हडपसर-सिमला ऑफिस चौक, पौड फाटा-पुणे विद्यापीठ, हडपसर-जेधे चौक, विमानतळ-वारजे चौक, जेधे चौक-वारजे