नवी मुंबई :- बेलापूर रेल्वे स्थानकातील ‘सिडको तारा’ कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या तर्फे रविवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यास 303 प्रकल्पबाधित तरूण-तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्यास प्रकल्पबाधित असलेल्या व प्रकल्पबाधित नसलेल्या अशा एकूण 18 उमेदवाराची निवड करण्यात आली. याशिवाय 219 उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. ‘सिडको तारा’ प्रकल्पातर्फे प्रकल्पबाधित तरूण-तरुणींना कौशल्य आधारित प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या प्रयत्नाचा भाग म्हणून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यामध्ये 539 उमेदवारांचा सहभाग
मेळाव्यामध्ये दूरसंचार, बिपिओ, ऑटोमोबाईल, सेवाक्षेत्र, लॅाजिस्टीक, विमा, विद्युत व दूरसंचार, मॅन्युफॅक्चरिंग, सुरक्षा आणि आयटी इ. क्षेत्रातील ईकार्ट लॅाजिस्टीक, हिंदुजा ग्लोबल सर्विसेस, दिशा कम्युनिकेशन, जे.बी. कॉर्पोरेशन, एल.आय.सी. लिमिटेड, युरेका आउट सोर्सिंग, सिमरन मोटर्स, युरेका फोर्बस, इंटेगोन इंडिया, सिप-आय, फ्रंटलाईन गार्ड, ग्रॅब, इ. एकूण 21 नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मेळाव्यामध्ये 539 उमेदवारांनी सहभाग घेतला. यामध्ये दहावी पास-नापास, बारावी, आयटीआय, डिप्लोमा,पदवी व उच्च पदवीधर या उमेदवारांचा सहभाग होता. मेळाव्यास ‘सिडको तारा’ प्रकल्प व्यवस्थापक, सामाजिक सेवा अधिकारी प्रमोद जाधव,आय.एल.एण्ड.एफ.एस चे प्रादेशिक प्रमुख सुनील जोसेफ व संपूर्ण ‘सिडको तारा’ टीम उपस्थित होती.सिडकोच्या सहव्यवस्थापकिय संचालिका प्राजक्ता लवंगारे वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोजगार मेळावा पार पडला.