पुणे । चवीला गोड, रंगाने पांढरी-पिवळसर आणि गर जास्त असणार्या गोल्डन सिताफळांना ग्राहकांकडून मोठी मागणी होत असून बाजारात खरेदीदारांकडून चांगली मागणी होत आहे. नेहमीच्या सिताफळांच्या तुलनेत गोल्डन सिताफळे ही आकाराने मोठी, जास्त दिवस टिकत असल्याने पसंती मिळत आहे.याबाबत मार्केटयार्ड येथील व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, गोल्डन सिताफळ हे इतर सिताफळांपेक्षा मोठे व चवीला गोड असते. इतरांच्या तुलनेत गोल्डनच्या बिया कमी असतात. झाडावरून पिकलेले फळ पडले तर ते दबते, पण फुटत नाही. फळ झाडावर पंधरा दिवस व काढल्यावर आठ दिवस टिकते. इतर जातींपेक्षा तीस ते पस्तीस टक्के गर असतो, तर गोल्डन सिताफळात पन्नास टक्क्यापर्यंत गर असतो.
दीड ते दोन महिने हंगाम
गेल्या वर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने उत्पादनात घट झाली होती. मात्र, यंदाच्या वर्षी बाजारात दाखल होणारे गोल्डन सिताफळ हे आकाराने मोठे तसेच चांगल्या दर्जाचे आहे. दीड ते दोन महिने गोल्डन हंगाम सुरू राहतो. इतर फळांच्या मानाने गोडी तसेच टिकाऊ असल्याने या फळाला फ्रुट स्टॉल, ज्युस विक्रेते आदींकडून मोठी मागणी होत आहे.
काही दिवसांत आवक वाढेल
सध्या बाजारात पुरंदर तालुक्यातून गोल्डन सिताफळांची आवक होत आहे. साधारण 150 ते 600 ग्रॅमपर्यंत या फळाचे वजन असेत. त्यास प्रतिकिलोस 50 ते 170 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या फळाचा हंगाम सुरू होते. येत्या काही दिवसांत ही आवक वाढेल असा अंदाजही मोरे यांनी व्यक्त केला आहे.
दरवर्षी गोल्डन सिताफळाचे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले जाते. यंदा सुमारे 600 ते 650 झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक झाडाला 150 ते 200 फळे लागतात. कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून गोल्डन सिताफळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. सिताफळांचा एकरी खर्च लागवडी नंतर दरवर्षी पंधरा हजार ते वीस हजार रुपये इतका येतो, तर उत्पन्न चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.
– एकनाथ यादव, शेतकरी