सिद्धगंगा मठाचे अधिपती श्री शिवकुमार स्वामी यांचे निधन

0

बंगळूर : कर्नाटकातील तुमकूर येथील लिंगायत समाजाच्या सिद्धगंगा मठाचे अधिपती श्री शिवकुमार स्वामी यांचे वयाच्या १११ व्या वर्षी निधन झाले आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि भाजपचे नेते बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली आहे.

श्री शिवकुमार स्वामी यांचे सोमवारी सकाळी ११.४४ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी २२ जानेवारीला सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहे, असे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितले. शिवकुमार स्वामी यांना अध्यात्मातील ‘चालता बोलता देव’ म्हणून ओळखले जात होते. गेल्या काही दिवसांपासून शिवकुमार स्वामी आजारी होते. दोन महिन्यांपासून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. त्यांचा प्रकृती खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवले होते. मात्र, अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना एक दिवसाची सुटी जाहीर केली आहे. श्री. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त केला आहे.