सिद्धप्रभा, विजय क्लब, जय भारत उपांत्यपूर्व फेरीत

0

मुंबई । विजय क्लब, सिध्दीप्रभा, जय भारत, यंग प्रभादेवी यांनी पिंपळेश्‍वर क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. करिरोड, स बा पवार मार्गावरील पिंपळेश्‍वर क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावरील मॅटवर सुरू असलेल्या सामन्यात विजय क्लबने ओम् ज्ञानदीप संघाचा प्रतिकार 53-29 असा संपविला. विश्रांतीला 23-15अशी आघाडी घेणार्‍या विजय क्लबने नंतरच्या डावात जोरदार आक्रमण करीत सामना एकतर्फी केला. सुधीर सिंग, सुरज साळवी यांना या विजयाचे श्रेय जाते. ओम ज्ञानदीप संघाकडून ओमकार पेनपुरे, शशांक मोकलं यांनी पूर्वार्धात बरी लढत दिली. नंतर मात्र त्यांची मात्रा चालली नाही. सिध्दीप्रभा मंडळाने डॉ.आंबेडकर संघाचे कडवे आव्हान 31-27 असे मोडून काढले. विवेक मोरे, मिलिंद पवार यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सिध्दीप्रभा संघाने पहिल्या डावात 17-11अशी आघाडी घेतली होती. दुसर्‍या डावात आंबेडकर संघाच्या ऋतिक कांबळे, अभिजित बामणे याने सिध्दीप्रभा संघाला विजयासाठी चांगलेच झुंजवले.

जय भारत संघाने नवं जवान संघाला 48-35 असे नमवत आपली धोडदौड सुरू ठेवली. पहिल्या डावात 29-19अशी आघाडी घेणार्‍या जय भारत संघाला दुसर्‍या डावात चिवट प्रतिकाराला सामोरे जावे लागले. जय भारत संघाकडून रोहन होघळकर, प्रजोत करमारे, तर नवं जवान संघाकडून भूषण शिर्के, साहिल साळुंखे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
शेवटच्या सामन्यात यंग प्रभादेवी संघाने वंदे मातरम संघाला 38-26असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यांतराला 23-10अशी आघाडी घेणार्‍या प्रभादेवीकरांनी उत्तरार्धात देखील उत्कृष्ट खेळ करीत हा विजय साकारला. सौरभ पेटकर, चंदन गुरव यांना या विजयाचे श्रेय जाते. रोहित काळे, अभिषेक जाधव यांचा खेळ वंदे मातरम संघाचा पराभव टाळण्यात कमी पडला.