मुंबई । मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विजेचा शॉक लागून एका 23 वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहम्मद नसीम अली असं मृत तरुणाचे नाव असून तो शिवडी परिसरात राहत होता. सिद्धिविनायक मंदिरात विजेच्या वायरिंगच काम सुरु होते. हा तरुण कॉन्ट्रॅक्टरसोबत काम करण्यासाठी मंदिरात गेला होता. पण मंगळवारी रात्री उशिरा मंदिरातील एका लोखंडी पाईपमध्ये वीज वाहत असताना, या पाईपच्या संपर्कात आल्याने मोहम्मद अलीला शॉक लागला.
मोहम्मदला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला. दादर पोलिसांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी मृत मोहम्मद अलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. अंगारकीच्या निमित्ताने मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्युत रोषणाई करण्यात आली, त्या कामासाठी हा मुलगा घटनास्थळी उपस्थित होता मात्र अचानकपणे त्याला शॉक बसल्यामुळे तो अखेर संपुष्टात आला.
मंदिरात गर्दी
दरम्यान, अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात सोमवारी रात्रीपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले. यंदाच्या वर्षीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यंंदाही रात्री उशिरापर्यंत हे गणेश दर्शन सुरुच होते.