मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डी गावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयाचा परिसर चिंचवड पोलीस ठाण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे केली आहे. महापालिकेचे नगरसेवक आणि पोलीस यांच्यात आज ऑटोक्लस्टर येथे बैठक पार पडली. यावेळी सचिन चिखले यांनी पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात मागणी केली.
हे देखील वाचा
निगडी ठाण्यापासून जवळ
सचिन चिखले म्हणाले की, निगडीचे शेवटचे टोक असलेले सिद्धीविनायक नगरी परिसराचा देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना एखाद्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी 7 किलोमीटर लांब असलेल्या देहूरोड पोलीस ठाण्यात जावे लागते. हे तेथील नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. सिद्धीविनायक नगरी ही निगडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे हा परिसर निगडी पोलीस ठाण्याला जोडल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल. आकुर्डी पोलीस चौकी ही निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आहे. त्यामुळे आकुर्डीगाव व परिसरात घडलेल्या गुन्ह्यांची तक्रार देण्यासाठी नागरिकांना भक्ती-शक्ती चौकात जावे लागते. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आकुर्डीगावातच आकुर्डी पोलीस चौकी उभारण्यात यावी. रावेतमधील डॉ.डी.वाय. पाटील महाविद्यालयाचा परिसरही देहूरोड पोलीस ठाण्याला जोडण्यात आला आहे. हे पोलीस ठाणे या परिसरापासून लांब आहे. त्यामुळे डॉ.डी.वाय. पाटील महाविद्यालयाचा परिसर जवळच असलेल्या चिंचवड पोलीस ठाण्याला जोडण्यात यावे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी उभारावी.