सिद्धीसाई इमारतीतील रहिवाशी अजूनही बेघरच

0

मुंबई : घाटकोपर येथील सिद्धीसाई इमारत कोसळून आता आठवडा होईल, तरीही या इमारतीमधील बेघर झालेल्या रहिवाशांची तात्पूरती निवासाची सोय सरकारने केलेली नाही. विशेष म्हणजे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः येथील नागरिकांना 2 दिवसांत तात्पूरत्या निवासाची सोय केली जाईल, तसेच 10 दिवसांत इमारत पुर्नबांधणीचे काम सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र सरकारी यंत्रणा असो किंवा महापालिका प्रशासन असो कुणीही यासाठी अद्याप प्रयत्न केलेले दिसत नाही.

संपत्तीहीन बनलेत रहिवाशी
या इमारतीमध्ये राहणार्या रहिवाशांनी एकतर त्यांच्यातीलच जीवापाड प्रेमाची, रक्ताच्या नात्यातील जवळच्या माणसांना गमावले आहे, त्यातच किंमती साहित्यही ढिगार्याखाली जाऊन नष्ट झाले आहे. त्यामुळे काही तरी विकून खायचे म्हटले तरी त्यांच्याकडे काहीच नाही. साधे कपडेही त्यांच्याकडे उरलेली नाही, अशी बिकट परिस्थिती या इमारतीमधील रहिवाशांची झालेली आहे. हे रहिवाशी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील एक रहिवाशी बिनिता रामचंदानी यांनी तर फेसबूकवर पोस्ट टाकून मुंबईकरांना मदतीसाठी याचना केली आहे.

पुन्हा एकदा आश्वासनच
दरम्यान या इमारतीमधील बेघर झालेल्या रहिवाशांना तातडीने झोपडपट्टी पुर्नवसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येईल, त्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातील, त्याकरता आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्थानिक आमदार राम कदम यांनी सांगितले.

नऊपेक्षा अधिक कुटुंबे बेघर
25 जुलै रोजी सिद्धीसाई ही इमारत कोसळली होती. तळमजल्यावर तोडफोडीचे बांधकाम करण्यात येत होते. त्यावेळी तेथील पिलर तोडण्यात आले होते. त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली होती. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून यातील नऊपेक्षा अधिक कुटुंब आता बेघर झालेली आहेत.