सिद्धेश परदेशी पार करणार सर्वात मोठा राजमार्ग

1

उरण । उरणच्या सिद्धेश परदेशी या तरुण दुचाकीस्वाराच्या विक्रमाला आजपासून सुरुवात झाली. देशातील महत्त्वाचा सुवर्ण चतुर्भुज हा 6 हजार किलोमीटरचा पट्टा अवघ्या 85 तासांत तो पार करणार आहे. यासाठी त्याला दिवसरात्र दुचाकी चालवत राहावी लागणार आहे. सिद्धेश प्रभाकर पंडित हा 22 वर्षीय दुचाकीवेडा तरुण भारत प्रवासासाठी निघाला आहे. यासाठी त्याने दिवसरात्र मेहनत घेतली आहे. सकाळी 11:45 वाजता त्याने सुवर्ण चतुर्भुज मार्गाकडे पनवेल पाळस्पाफाटा येथून वाटचाल केली. दिवसरात्र प्रवास करत 85 तासात 6 हजार किलोमीटरचा प्रवास करत विक्रम पूर्ण करणार आहे.

हेल्प पूअर हा संदेश घेऊन हा विक्रम पूर्ण करणार
सुवर्ण चतुर्भुज म्हणजे जयपूर मार्गे दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुन्हा नवी मुंबई, असा हा मार्ग असणार आहे. देशातील गरिबी पाहता गरिबांना मदत करूनच हा देश प्रगतिपथावर येईल, असा त्याचा विश्‍वास असल्याने हेल्प पूअर हा संदेश घेऊन हा विक्रम पूर्ण करणार आहे. सिद्धेशच्या या विक्रमासाठी त्याच्या मित्रांकडून सहकार्य लाभले असून, आईवडिलांचा यासाठी पाठिंबा आहे. यामुळे सिद्धेश अडचणींवर मात करत हा विक्रम पूर्ण करणार असल्याचा विश्‍वास दाखवत आहे. दरम्यान, नियोजित वेळेत हा विक्रम पूर्ण झाल्यास सिद्धेश सुवर्ण चतुर्भुज दुचाकीवरून पार करणारा सर्वात तरुण दुचाकीस्वार ठरणार आहे.