सिद्धेश, शौर्य, स्वस्तिका, दिशा, ओंकार, सृष्टीला विजेतेपद

0

पुणे । डेक्कन जिमखाना आयोजित मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्याच्या सिध्देश पांडे, मुंबई उपनगरच्या शौर्य पेडणेकर, रायगडच्या स्वस्तिका घोष, ठाण्याच्या दिशा हुलावळे, मुंबई उपनगरच्या ओंकार तोरगळकर, सृष्टी हलंगडी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत युथ(21 वर्षाखालील)मुलांच्या गटात अंतीम फेरीत ठाण्याच्या दुसर्‍या मानांकीत सिध्देश पांडेने मुंबई शहरच्या अव्वल मानांकीत शुभम आंब्रेचा 11-9 ,11-5, 9-11,11- 8, 11-3 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले.त्याचे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे. तर मुलींच्या गटात रायगडच्या बाराव्या मानांकीत स्वस्तिका घोषने ठाण्याच्या तिस-या मानांकीत श्रेया देशपांडेचा 8-11, 11-9, 11-9, 11-7, 9-11, 11-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

शौर्य पेडणेकर अजिंक्य
ज्युनिअर (18 वर्षाखालील) मुलांच्या गटात अंतीम फेरीत मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत शौर्य पेडणेकरने ठाण्याच्या दुसर्‍या मानांकीत दिपीत पाटीलचा 14-12, 11-7, 9-11, 11-5, 12-10 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. तर मुलींच्य ागटात ठाण्याच्या दुसर्‍या मानांकीत दिशा हुलावळेने मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत सृष्टी हलंगडीचा 6-11, 11-7, 13-11, 4-11, 11-8, 11-9, असा पराभव करत विजेतेपद पटकावले. तीचे हे या गटातील पहिलेच विजेतेपद आहे.

पुरुष गटात ओंकारचा विजय
पुरुष गटात मुंबई उपनगरच्या बिगर मानांकीत ओंकार तोरगळकरने ठाण्याच्या अव्वल मानांकीत सिध्देश पांडेला पराभवाचा 11/5, 11/7, 15/13, 12/10 असा धक्का देत विजेतेपद पटकावले. तर महिलांच्या गटात मुंबई उपनगरच्या सातव्या मानांकीत सृष्टी हलंगडीने मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत दिव्या महाजनचा 11/9, 8/11, 6/11, 11/9, 11/7, 9/11, 12/10 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. सृष्टी ही पोदार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावी इयत्तेत शिकत असून दहिसर पीपीएस येथे प्रशिक्षक तरूण गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तीचे या वर्षातील हे तीसरे विजेतेपद आहे.