सिध्दीविनायक अपार्टमेंटमधील शिक्षकाच्या घरात भरदिवसा घरफोडी

0

जळगाव । शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोर्‍या घरफोड्यांचे सत्र सुरुच आहे. मागील वर्षाच्या तुलनेत देखील घरफोड्यांची संख्या जास्त आहे. पोलिस प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने चोर्‍या घरफोड्यांमुळे जळगावकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज रविवारी होळीच्या दिवशी भरदिवसा गणेश कॉलनी परिसरातील सिध्दी विनायक अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. यातच चोरट्यांनी अवघ्या अर्ध्या तासात घरफोडी करत चार ते पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. तर चोरटे हे पांढर्‍या रंगाच्या कारमधून आल्याचा नागरिकांकडून अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सासर्‍यांकडे गेले जेवायला…
गणेश कॉलीनीतील सिध्दी विनायक अर्पाटमेंटमधील पहिल्या मजल्यावरील प्लॅट नंबर 2 मध्ये नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षक अरुण सुरेश ठाकरे हे पत्नी कविता यांच्यासोबत राहतात. कविता ठाकरे या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा प्रज्वल हा पुणे अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. प्रज्वल याचे किराण्याचे सामान संपले असल्याने त्याचा सामान घेण्यासाठी कविता ठाकरे या काल शनिवारी रात्री पुणे येथे मुलाकडे गेल्या होत्या. घरी अरुण ठाकरे हे एकटेच होते. होळी असल्याने व पत्नी घरी नसल्याने अरुण ठाकरे यांना गणेश कॉलनीतील श्रीहरी नगर असलेलेले त्यांचे सासरे प्रा. बी.जे.जाधव यांनी घरी जेवणासाठी बोलाविले होते.

रोख रकमेसह 4 लाखाचे दागिने लंपास
घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील कपाट व त्यातील सगळे ड्रावर उघडून सामान अस्ताव्यस्त पडला होता. कपाटातील रोख रक्कम 10 हजार रुपये रोख, 3 तोळ्याची मंगळपोत, 3 तोळ्याचा नेकलेस, 5 ग्रॅम कानातले, 5 ग्रॅम टॉप्स असा सुमारे 4 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची माहीती अरुण ठाकरे यांनी दिली. घटनास्थळी पोलिस पथकाने पाहणी केली.त्यानतंर फिंगर प्रिंट पथक देखील पाचारण करण्यात आले. याबाबत पोलिसात घरफोडीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खिडकीतून कपाटाचा दार दिसले उघडे
जेवण झाल्यावर अरूण ठाकरे हे दुपारी दिड वाजता घरी जाण्यासाठी तेथून निघाले. घरी पायी येत असतांना त्यांना दुरूनच त्यांच्या खिडकीतून देवघरातील लहान कपाटाचे दार उघडे दिसले. त्यांना संशय आल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली यानंतर घराचा कुलूपच गायब झाल्याचे दिसताच त्यांना चोरी झाल्याचा संशय येताच त्यांनी घरात जावून पाहिल्यानंतर पहिल्याच खोलीतील डॉव्हरमधील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसताच चोरी झाल्याचे त्यांना खात्री झाली. त्यांनी यानंतर शेजार्‍यांकडे धाव घेत घरात चोरी झाल्याचे सांगितले आणि घराची पाहणी केली. यावेळी घरातील मधल्या खोलीतील दोन्ही कपाटही चोरट्यांनी फोडली होती. तर पलंगावरील सामानाचीही नासधूस केल्याचे त्यांना दिसून आले. यानंतर त्यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात घरफोडी झाल्याची माहिती दिली.