अकोला/मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आपल्याच सरकारविरोधात अकोल्यात सुरु केलेले शेतकरी आंदोलन मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणे झाल्यानंतर व राज्य सरकारने मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बुधवारी मागे घेण्यात आले. सकाळी राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सिन्हा यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, त्यामुळे आपण आंदोलन मागे घेत असल्याने सिन्हा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, दोन दिवस चाललेल्या या नाटकी आंदोलनातून विदर्भातील शेतकर्यांच्या पदरात आश्वासनांव्यतिरिक्त काहीही पडले नसून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची हवा काढण्यासाठीच हे ड्रामेबाज आंदोलन करण्यात आले, असा दैनिक जनशक्तिने व्यक्त केलेला अंदाज खरा असल्याच्या प्रतिक्रिया राज्यभरातून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची हवा काढली!
शेतकर्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी जागर मंचने भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात आंदोलन पुकारले होते. परंतु, दोन दिवसांपूर्वी अचानक हे आंदोलन सिन्हा यांनी ताब्यात घेऊन जोरदार ड्रामेबाजी सुरु केली. अकोला जिल्हाधिकारी यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य करण्यास तयार आहोत; तरी आंदोलन मागे घ्या, अशी विनंती करूनही सिन्हा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून स्वतःला अटक करून घेतली व पोलिस मुख्यालयात धरणे आंदोलन सुरु केले. त्यामुळे देशभरातील प्रसारमाध्यमांचा गराडा त्यांच्याभोवती पडला. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन जोरात सुरु असतानाच, अचानक हे आंदोलन केंद्रस्थानी आल्याने राष्ट्रवादीच्या आंदोलनाची हवाच निघून गेली. तथापि, बुधवारी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणे झाल्यानंतर आंदोलन गुंडाळण्याची घोषणा सिन्हा यांनी केली. शेतकर्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन, उडिद, मूग विकले असेल तर हमीभावाच्या फरकाची रक्कम शेतकर्यांना मिळेल, शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, हमीभावानुसार उडिद, मूग, सोयाबीनची विनाअट नाफेडमार्फत खरेदी करण्यात येईल. बोंडअळीचे पंचनामे करून शेतकर्यांना महिनाभरात मदत दिली जाईल, अशी आश्वासने यशवंत सिन्हा यांच्या पदरात पडलेली आहेत. शेतकर्यांचा जेव्हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा आंदोलन करायला अकोल्यात येईल, असे आश्वासनही यावेळी सिन्हा यांनी याप्रसंगी दिले.
सर्वपक्षीय नेत्यांनी दिला होता आंदोलनाला पाठिंबा
यशवंत सिन्हा यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पहिल्या फेरीत अकोला जिल्हाधिकारी यांनी जी आश्वासने दिली तीच आश्वासने मुख्यमंत्र्यांनीही दिली होती. शेतकर्यांचा किती माल घ्यायचा हे नाफेड ठरविणार नाही, शेतकरी ठरवतील. पूर्ण शेतमाल हमीभावानेच खरेदी करावा लागेल या मुद्द्यावर प्रारंभी मुख्यमंत्री अनुकूल नव्हते. परंतु, दुसर्या फेरीतील चर्चेत ते अनुकूल झाले. त्यानंतर आंदोलनाची समाप्ती करण्यात आली. हे आंदोलन चांगलेच तापल्यानंतर आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन, तृणमूल काँग्रेसचे खासदार त्रिवेदी यांनी यशवंत सिन्हा यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी यांनीही सिन्हा यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, भारिप-बमसंचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही सिन्हा यांच्या फोनवर बोलून पाठिंबा जाहीर केला होता. मंगळवारी रात्री प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनीही या आंदोलनात सहभागी होत असल्याची घोषणा केली होती.
‘जनशक्ति’च्या भूमिकेचे शेतकरीवर्गात स्वागत!
भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचे अकोल्यातील आंदोलन हे राज्यातील फडणवीस सरकारला तारणारे असून, शेतकर्यांचा आक्रोश थंड करण्यासाठी व राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची हवा काढण्यासाठी असल्याचा गौप्यस्फोट दैनिक जनशक्तिने बुधवारच्या ‘आंदोलनाची ढोंगे कशाला? या ’संपादकीयमध्ये केला होता. ‘जनशक्ति’च्या या सडेतोड भूमिकेचे राज्यभरातील शेतकर्यांनी स्वागत केले. अकोल्यात माजी केंद्रीय मंत्री सिन्हा यांनी शेतकरीप्रश्नी नाटकी आंदोलन सुरु केले असून, हे आंदोलन हल्लाबोल आंदोलनावरून लक्ष हटविण्यासाठीची खेळी व स्थानिक शेतकरी नेत्यांच्या कार्यकर्त्यांत फूट पाडणारी बाब आहे, असे मत या संपादकीयमध्ये प्रकर्षाने मांडण्यात आले होते.