भीषण अपघात: सिमांचाल एक्स्प्रेसचे डबे घसरून ७ प्रवाशांचा मृत्यू !

0

पाटणा – बिहारमधील सहदेई बुजुर्ग येथे आज रविवारी ३ फेब्रुवारी रोजी मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. जोगबनी-आनंद विहार टर्मिनल सीमांचल एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरुन घसरले आहेत. यामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २४ जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. आज पहाटे ३.५८ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. ही एक्स्प्रेस जोगबनीहून दिल्लीच्या दिशेने जात होती. या भीषण दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळावर सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

एनडीआरएफची टीम आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करत दुर्घटनेबाबतची माहिती दिली. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची तर जखमींना प्रत्येकी १ लाखाची मदत जाहीर केली आहे.