जळगाव । मुस्लिम तरुणांमध्ये इस्लामिक विचारांची मुल्ये रुजविणे, त्यांना उच्चशिक्षीत करणे आणि राजकीयदृष्ट्या जागृत करण्याच्या उद्देशाने 17 वर्षापुर्वी सिमी संघटनेची स्थापना झालेली होती. मात्र कट्टरवादी लोक या संघटनेत शिरल्याने संघटनामुळे उद्देशापासून भरकटली. यातुन सिमीच्या दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग वाढला. अतिशय दहशतवादी रुप यासंघटनेने साकारले होते. मी पहिल्यांदा जळगावात निघालेल्या राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या मोर्चात सिमी या देशद्रोही संघटनेवर बंदी लादावी अशी मागणी केली होती. त्यामुळे मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सिमीच्या विरोधात बोलणार्यांना धमक्या यायच्या त्यावर पुस्तक लिहीणे ही खुप मोठी धाडसी वृत्ती आहे. सिमीवर लिखाण करण्याचे धाडस करणे हीच मोठी गोष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. साईमतचे कार्यकारी संपादक विजय वाघमारे लिखीत ‘सिमी : दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. रविवारी 6 रोजी शहरातील लेवाभवन येथे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडसे होते.
मुस्लिम समुदायाचा विरोध नाही
‘वंदे मातरम्‘ या शब्दात खुप मोठी ऊर्जा आहे. ‘वंदे मातरम्‘ म्हणणार नाही, अशी भुमिका संपूर्ण मुस्लिम समुदायाची नाही, मात्र काही दोन चार बोटावर मोजण्याइतपत समाजकंटक असतात ते धर्माचे आड येऊन जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करतात असे आमदार खडसे यांनी सांगितले. भारतात जन्म घेऊन संपुर्ण जीवन भारतातच व्यतित करणार असल्यावर वंदे मातरम म्हणायला काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. सिमी असो वा इसीस आपण कोणाच्याही धमकीने घाबरत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
धक्कादायक उलगडा
सिमी संघटनेची सुत्रे जळगाव जिल्ह्यातुन हलत होती ही जिल्ह्यासाठी फार मोठी धक्कादायक बाब होती. सिमी खटल्याबाबत सखोल माहिती पुस्तकाच्या रुपात मांडून विजय वाघमारे यांनी भविष्याच्या दृष्टीने संग्रहीत लिखाण केले आहे. त्यांच्या लिखाणातुन सामान्य नागरिकांना सिमी खटल्याचा उलगडा होईल असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
वाघमारे हे आचरणाने पुरोगामी
स्वतःला पुरोगामी, पुरोगामी म्हणणारे अनेक आहेत पण आचरणात आणणारे कमी असतात. मात्र विजय वाघमारे हे विचारातुन नाही तर आचरणातुन देखील पुरोगामी आहे. कारण त्यांनी पाकिस्तानी मानवी हक्क कायकर्त्या मलाला युसुफझाई यांच्या नावावरुन स्वतःच्या मुलीचे नाव मलाला ठेऊन त्यांनी आचरणाने पुरोगामी असल्याचे सिध्द केले आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ हे वाक्य वाघमारे यांना लागु होते असे प्रतिपादन दैनिक जनशक्तिचे समुह संपादक शेखर पाटील यांनी प्रास्ताविकात केले.
यांची होती उपस्थिती
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, आ.राजुमामा भोळे, अभिनव प्रकाशन, पुणेचे समीर दरेकर, सरकारी वकील अॅड.केतन ढाके, विष्णु भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, सिमी खटला चालविणारे अॅड.के.डी.पाटील, प्रा.आर.एन.महाजन, विशाल देवकर, साईमतचे संपादक प्रमोद बर्हाटे, डी.जी.पाटील, अॅड.जमील देशपांडे आदी उपस्थिती होती.
भविष्यात लिखाण करण्याची ऊर्जा
दैनिकाचा ग्रामीण वार्ताहर म्हणून सुरु केलेल्या प्रवासात अनेक अनुभव आले. क्राईम रिपोर्टर म्हणून काम करतांना आलेल्या अनुभवातुन सिमी खटल्याचा एक अनुभव होता त्यावर लिखाण करण्याचे ठरविले. या पुस्तकातुन भविष्यात आणखी विविध विषयांवर संशोधनात्मक पध्दतीचे सामाजिक वेध घेणारे लिखाण करण्याची ऊर्जा मिळाली आहे. आगामी काळात जळगाव सेक्स स्कँडल व घरकुल घोटाळा या विषयावर पुस्तके लिहणार असल्याचा मनोदय सिमी पुस्तकाचे लेखक विजय वाघमारे यांनी व्यक्त केला.