धरणगाव । सिमीसारख्या राष्ट्रद्रोही संघटनेवर अभ्यासपूर्ण लिखाण करणे याला खूप मोठे धाडस आणि निर्भिडता लागते. ‘सिमी’ द फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया’ या पुस्तकातून लेखक विजय वाघमारे यांनी अशीच निर्भिडता दाखविली आहे. तर पोहेकॉ रामकृष्ण पाटील यांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेलाही तोड नाही, अशा शब्दात चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी वाघमारे व पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. येथील विक्रम वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने दोघांच्या नागरी सत्काराचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी श्री.बच्छाव बोलत होते. यावेळी बोलतांना श्री.बच्छाव म्हणाले की, सिमी संघटनेच्या काळ्या इतिहासाची माहिती या पुस्तकातून जिल्ह्यासह राज्यातील नागरीकांना होणार आहे. जिल्हा पोलीस दलाने केलेला तपास हा आतापर्यंतचा सर्वोत्तम तपास असून आपण याच जिल्हा पोलीस दलाचा घटक असल्याचा अभिमान असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे निर्भिड पत्रकारीतेच्या माध्यमातून वाघमारे यांनी सिमीसारख्या संघटनेवर लिखाण करण्याचे धाडस दाखविले.
वाघमारे व पाटील यांचा सत्कार
शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष, मित्र परिवाराच्या वतीने लेखक व पत्रकार विजय वाघमारे व पोहेकॉ रामकृष्ण पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कान्यकुंज ब्राह्मण समाज पंच मंडळ, मराठा समाज पंच मंडळ,वाणी समाज मंच मंडळ, लहान माळीवाडा मित्र मंडळ, व्यंकटेश पतपेढी, रोटवद मराठा समाज व ग्रामस्थ, वैदु समाज मंडळ, विवेकानंद वाचनालय, राजपूत समाज पंचमंडळ, विवेकानंद शिक्षणप्रसारक मंडळ, जनकल्याण पतसंस्था, रामदेवजीबाबा मित्र परिवार, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह अनेकांनी दोघांचा जाहीर सत्कार केला.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
विजय वाघमारे यांनी ‘सिमी’ संघटनेवर लिहिलेले अभ्यासपूर्ण पुस्तक तसेच तालुक्यातील रोटवद मुळगाव असलेले पोहेकॉ रामकृष्ण पाटील यांनी पोलीस दलातर्फे चालविलेला सिमीचा खटला याबाबत विक्रम वाचलनालयातर्फे जाहीर नागरी सत्काराचे आयोजन गुरुवारी सायंकाळी वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, विक्रम वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.आर.एन. महाजन, बाळासाहेब चौधरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील, सिनेट सदस्य प्रा. डी.आर. पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, राष्ट्रवादीचे दीपक वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी धरणगाव पोलीस स्थानकाचे पो.नि. श्री.सोनवणे, भाजपचे शिरीष बयस, गटनेते कैलास माळी, काँग्रेसचे चंदन पाटील, गुलाब मराठे, ईश्वर सोनार, अभिजीत पाटील, रिपाईचे गोवर्धन सोनवणे, पत्रकार भगिरथ माळी, धर्मराज मोरे, मगनलाल बन्सी, विजय शुक्ला, कल्पेश महाजन, शिवसेनेचे विजय महाजन, योगेश वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रस्तावना वाचनालयाचे संचालक महेश अहिरराव यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ललीत उपासनी यांनी केले.
पोलिस अधिकारी व कर्मचारी भारावले
वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.आर.एन.महाजन यांनी मनोगत व्यक्त करत असतांना जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक करीत होते. त्याचवेळी त्यांनी जिल्हा पोलीस दलाला मानाची वंदना देत असल्याचे सांगत जिल्हा पोलीस दलासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाट करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी उभे राहत जिल्हा पोलीस दलासाठी टाळ्या वाजवित त्यांच्या कामगिरीला एक प्रकारे सलामी दिली. यावेळी उपस्थित अधिकारी श्री.बच्छाव, श्री.वाघमारे व श्री.सोनवणे यांच्यासह उपस्थित पोलीस कर्मचारी भारावून गेले होते.