पुणे: विमानतळ परिसरातील सिम्बायोसिस महाविद्यालयातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
राहुल अनिल आगरवाल (वय 20, रा. विमानतळ, मूळ. नेपाळ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल मूळचा काठमांडूचा आहे. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर तो पुण्यात शिक्षणासाठी आला होता. सिम्बायोसिसमध्ये तो बीबीएच्या दुसर्या वर्गात शिकत होता. कोर्णाकनगर येथे एका रो हाउसमध्ये त्याच्या तीन मित्रांसोबत राहत होता. गुरुवारी त्याचे मित्र क्लाससाठी गेले होते. त्यावेळी राहुलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
राहूल अभ्यासात हुशार होता. त्याच्या घरची परिस्थितीही चांगली आहे. त्याला इतर काही टेन्शनही नव्हते, असे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे त्याने प्रेमप्रकरणातून तर आत्महत्या केली नाही ना, याबाबत पोलिस तपास करत आहेत.