पिंपरी-चिंचवड : आई माता ट्रस्ट आणि सिरवी क्षत्रिय समाजाच्या वतीने निगडी-प्राधिकरण येथे आई माता मंदिरात आई मातेचा 602 वा जन्मोत्सव सोहळा समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी आठ वाजता जन्मोत्सव होमहवन, आरती तसेच महा वस्त्र कार्यक्रमाने मातेच्या भादवी बीज कार्यक्रमालादेखील सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर शैलेजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, प्रमोद कुटे, शर्मिला बाबर, आई माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तेजाराम लचेटा, उपाध्यक्ष मोहनलाल आगलेसा, सचिव नेमाराम गेहलोत, रामलाल सोलंकी, मोहनलाल आगलेसा, मोहन चौधरी, महिला मंडळाच्या अध्यक्ष धापुदेवी पुनाराम, अनिता जगदीश, दुर्गादेवी चंदुलाल, लीला रामलाल उपस्थित होते.
सिरवी समाजाचे योगदान मोठे
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपमहापौर शैलेजा मोरे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात सिरवी समाजाचे मोठे योगदान आहे. हा समाज शहरात एकोप्याने नांदत असून, शहरातील लहान-मोठ्या उद्योग व व्यवसायात या समाजाने भर घातली आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, निगडी प्राधिकरणातील आई माता मंदिरापासून संभाजी चौक, भेळ चौक परिसरातून उत्सव मिरवणूक काढण्यात आली. त्यात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यानंतर समाजातील 150 गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अखंडपणे चालतेय परंपरा
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ट्रस्टचे अध्यक्ष तेजाराम लचेटा म्हणाले की, गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून सिरवी क्षत्रिय समाज पिंपरी-चिंचवड शहरात वास्तवास आहे. रोजगारासह आपला पारंपरिक मिठाई, किराणा मालाच्या व्यवसायातून हा समाज नागरिकांना सेवा देत आहे. शहरातील सिरवी क्षत्रिय समाजाच्या एकत्रिकरणासाठी निगडी प्राधिकरणात 1989 साली आई मातेच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यानंतर कुठलाही खंड न पाडता सलग 28 वर्षांपासून आई मातेचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.