जळगाव। न्यु.बी.जे. मार्केट परिसराती खाद्य पदार्थाच्या गाडीवरील सिलेंडरची नळी निघून भडका झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. यात खाद्य पदार्थ बनविण्याचे साहित्य जळून खाक होवून तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेंदालाल मिल येथील रहिवासी अमजद खान खलील खान यांच्या न्यु.बी.जे.मार्केट परिसरात सुहाणा चायनीज व नाश्ताच्या दोन गाड्या आहेत. गुरूवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास कारागिर गाडीवर काम करीत असतांना अचानक सिलेंडरची नळी निघून भडका झाला. भडक्यामुळे गाडीला आग लागली. ही घटना परिसरातील नागरिकांना लक्षात येताच त्यांनी लागलीच बालटीच्या सहाय्याने पाण्याचा मारा करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. पंधरा मिनीटाच्या प्रयत्न केल्यानंतर त्यांना आग विझविण्यात यश आले.
यानंतर महानगर पालिकेच्या अग्निशमन बंबाने देखील घटनास्थळी पाचरण केले होते. मात्र, नागरिकांनीच आग विझविल्याने त्यांना पुन्हा परतावे लागले. या भडक्यात खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्यांचे नुकसान झाले आहेत. तर गाडीही किरकोळ जळाली आहे. यातच तीन हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज कारागिराकडून वर्तविण्यात आला.