सिलेंडरांच्या ट्रकवर चढून मद्यपी चालकाची स्फोटाची धमकी

0

जळगाव। आकाशवाणी चौफुलीवरील सिग्नलवर मिनी ट्रकला धडक दिल्यानंतर इण्डेंन गॅसच्या ट्रकच्या मद्यपी चालकाने तेथून भरधाव वेगात ट्रक घेवून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजिंठा चौफुलीजवळ दुचाकीस्वारांनी ट्रक अडविल्यानंतर पब्लिक मार बसेल या धाकाने चक्क मद्यपी चालकाने आगपेटी हातात घेवून ट्रकवर चढत सिलेंडरांचा स्फोट करून सर्व उडवून देईल अशी धमकी देत गोंधळ घातल्याचा थरार शनिवारी 1.15 वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, मद्यपी ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून त्यास एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेवून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिनी ट्रकला दिली जोरदार धडक
शनिवारी सकाळी मनमाड येथून इण्डेंन गॅसचा मालवाहू ट्रक (कं. एमएच.04.बीयु.9379) मध्ये दिडशे ते दोनशे सिलेंडर घेवून मद्यपी चालक संतोष बाबुराव केकांत हा शहरातील कालींकामाता चौफुलीजवळ डिलेव्हरीसाठी रवाना झाला. दरम्यान, जळगावात ट्रक दाखल झाल्यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील आकाशवाणी चौकातील रेड सिग्नल सुरू असल्यामुळे संतोष केकांत यांनी ट्रक थांबवला. मात्र, सिग्नल सुटताच मद्यपी चालक संतोष यांने चुकून रिव्हर्स गेअर टाकल्याने ट्रक पूढे न जाता भरधाव वेगात मागे आला आणि त्यात मागे उभा असलेला एमआयडीसीतील अनिकेत ट्रान्सपोर्टचा मिनी ट्रक (कं.एमएच.12.एलटी.6099) ला जोरदार धडक दिली. यात मिनी ट्रकचे किरकोळ नुकसान झाले. मात्र, त्यावरील चालक अख्तर शेख यांनी संतोष केकांत यांना ट्रक थांबविण्यास सांगितले. मात्र, केकांत यांनी ट्रक न थांबवता भरधाव वेगात निघून गेले. अख्तर शेख याने लागलीच आपल्या ट्रान्सपोर्टमध्ये फोन लावल्यानंतर तेथील कर्मचारी अल्लाउद्दीन शेख हे दुचाकीने त्याठिकाणी आले आणि इण्डेंन गॅसच्या ट्रकला थांबविण्यासाठी पाठलाग केला.

भरधाव वेगात पळवला ट्रक
मिनी ट्रकला धडक दिल्याने काही जण आपला पाठलाग करत असल्याचे पाहून संतोष केकांत याने भरधाव वेगात ट्रक पळवला तर रस्त्यातील वाहनांना ओव्हरटेक करतांना काहींना कट मारला. त्यामुळे लहान-मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, अल्लाउद्दीन यांनी इच्छादेवीपासून पाठलाग करण्यास सुरूवात केल्यानंतर अखेर त्यांनी अंजिठा चौफुलीजवळ ट्रकच्या पूढे दुचाकी थांबवून ट्रक अडवला आणि धडक देवून पळून जाण्याबाबत जाब चिारला. आपल्याला चोप बसेल या भितीने मद्यपी चालक संतोष केकांत हा भेदरलेला होता.

आगपेटीने सिलेंडरांचा स्फोट करण्याची धमकी
आपल्याला चोप देतील तसेच पोलिसात नेतील या भितीने भेदरलेल्या मद्यपीचालक संतोष केकांत याने चक्क ट्रकमधील आगपेटी हातात घेवून ट्रकवर चढला. त्यानंतर आगपेटीतील काडी जाळून सिलेंडरांचा स्फोट करून सगळच उडवून स्वत:ला संपविण्याची धमकी देत गोंधळ घातला. त्यानंतर अल्लाउद्दीन व मिनी ट्रकचालक अख्तर शेख तसेच नागरिकांनी चालकाची समजूत घालून खाली उतरविले व त्यानंतर त्याला रिक्षात बसवून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर अल्लाउद्दीन यांनी पोलिसांना संपूर्ण हकीकीत सांगितल्यानंतर पोलिसांनी मद्यपी चालक संतोष केकांत यांला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.