ठाणे : राज्यात विविध ठिकाणी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. आंदोलन मागे घेतल्यानंतर वातावरण निवळले असतानाच आता ठाण्यात सिव्हिल रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. रुग्णाला चांगल्या प्रकारे उपचार मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णासोबत चार ते पाच जण होते. रुग्णाला उपचार चांगल्या प्रकारे मिळत नसल्याचा आरोप करून त्यांनी शिकाऊ डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोडही केली आहे. यामुळे डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ठाण्यातील महागिरी परिसरातील व्यक्तीच्या हाताला जखम झाली होती. हातातून रक्तस्त्राव होत होता. त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यासोबत चार ते पाच जण होते. रुग्णावर व्यवस्थित उपचार केले जात नसल्याचा आरोप करून त्यांनी डॉक्टर जावेद शेख आणि डॉक्टर अन्सारी यांना मारहाण केली. त्यानंतर रुग्णालयाची तोडफोडही केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते, पुढील तपास सुरू आहे.