सिव्हीलमध्ये तंबाखू खाणार्‍यांवर कारवाई

0

जळगाव । शहरातील सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे व तंबाखू खाण्यावर शासनाने बंदी घातली असली तरीही देखील नागरिकांकडून सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केले जाते आणि तंबाखू खावून भिंतीवर रस्त्यावर थुंकले जाते. आज रविवारी मात्र, सिव्हीलमध्ये सकाळी 11 वाजता जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने तंबाखू खाणार्‍या सात नागरिकांना पकडून त्यांना जागेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रत्येकाला ठोठावला दंड
जिल्हा शल्यचिकित्सक सुनिल भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून धुम्रपान करणार्‍या तसेच तंबाखू खावून भिंती रंगविणार्‍या रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. रविवारी देखील सकाळी 11 वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी जयकर, मुकरदम रविंद्र पवार, मंगेश बोरसे, दंत शल्यचिकित्सक डॉ. संपना गोस्वामी तसेच सिव्हीलमधील धुम्रपान निर्मुलन विभाग अशांच्या पथकाने सिव्हीलमधील संपूर्ण परिसरात फेरफटका मारत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदीची मोहिम राबविली.

यांच्यावर केली कारवाई
सिव्हील वार्डात पथकाला सात जण तंबाखू सेवन करतांना आणि धुम्रपान करतांना मिळून आले. पथकाने त्यांना जागेवर पकडून या व्यासनामुळे होणार्‍या आजारांची माहिती देत त्यांना जागीच 100 रुपयांचा दंड ठोठावला. यात कैलास लोटन पाटील, शिवदास माणिक कोळी, प्रकाश सुपडू सोनवणे, रामसिंग जितेंद्र बाबा, पुनमसिंग जालसिंग पाटील, याकुब नबाब तडवी, मंजूर नबाब तडवी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.