जळगाव। सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे व तंबाखू खाण्यावर शासनाने बंदी घातली असली तरीही देखील नागरिकांकडून सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केले जाते आणि तंबाखू खावून भिंतीवर रस्त्यावर थुंकले जाते. आज गुरुवारी मात्र, सिव्हीलमध्ये सकाळी 10 वाजता जिल्हा शल्यचिकित्सकांच्या व धुम्रपान निर्मुलन पथकाने धुम्रपान करणार्या व तंबाखू खाणार्या नागरिकांसह कर्मचार्यांना पकडून त्यांना जागेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशा 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्रत्येकाला ठोठावला 200 रुपयांचा दंड
राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरूवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक सुनिल भांमरे, वैद्यकीय अधिकारी जयकर, मुकरदम रविंद्र पवार, मंगेश बोरसे, दंत शल्यचिकित्सक डॉ. संपना गोस्वामी, पोलिस कर्मचारी उमाकांत चौधरी तसेच सिव्हीलमधील धुम्रपान निर्मुलन विभाग अशांच्या पथकाने सिव्हीलमधील संपूर्ण परिसरात फेरफटका मारत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदीची मोहिम राबविली. यात सिव्हील परिसरात पथकाला आठ जण तंबाखू सेवन करतांना आणि धुम्रपान करतांना मिळून आले. पथकाने त्यांना जागेवर पकडून या व्यासनामुळे होणार्या आजारांची माहिती देत त्यांना जागीच 200 रुपयांचा दंड ठोठावला. तर सिव्हीलच्या दोन कर्मचार्यांवर देखील कारवाई करण्यात आली. ही मोहिम नेहमीच राबविण्यात येणार असल्याची जिल्हा शल्यचिकित्सक सुनिल भांबरे यांनी दिली आहे.
तंबाखू सेवन करणार्यांची होणार नोंद
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू सेवन करणार्या रुग्णांची नोंद जिल्हा सामान्य रूग्णालयात आता करण्यात येणार आहे. सिव्हीलमध्ये आलेल्या रूग्णाला आधी केसपेपर घेतल्यानंतर त्या केसपेपर टीसीसी यस अॅण्ड नो असे लिहिलेले असेल. जर रूग्ण तंबाखू सेवन करत असेल तर यस यावर टिकमार्क करावे लागणार आहे. यानंतर रूग्णाला तंबाखू नियंत्रण कक्षा पाठविले जातील.