सिव्हील रुग्णालयाच्या आवारात तरूणांवर प्राणघातक हल्ला

0

जळगाव । जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाईकास पाहण्यासाठी आलेल्या तीन तरूणांवर मोटारसायकलवरून आलेल्या तरूणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास रूग्णालयाच्या आवारात घडली. यात तिघेही तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याबरोबर रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यास देखील मारहाण करणार्‍या तरूणांकडून धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान, रविवारी सकाळी रिक्षा व मोटारसायकलच्या अपघात होवून हाणामारी झाली होती. त्यातून ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी पोलिसांचा ताफा
जिल्हा रूग्णालयात तरूणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कळताच डिवायएसपी सचिन सांगळे, पोलिस निरिक्षक सुनिल गायकवाड, शेखर जोशी, ललित पाटील, दिलीप पाटील आदी कर्मचार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी जखमींच्या नातेवाईकांनी रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होताच गर्दीला पोलिसांनी पांगवली. तर संशयितरित्या फिरणार्‍या एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अशी घडली घटना
जिल्हा सामान्य रूग्णालयातील 13 क्र. वार्डात तमीजा बी शेख रेहमान ही महिला उपचार घेत आहे. त्यांना पाहण्यासाठी रविवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास सुलेमान खान अबजल खान, गुड्डु काकर सलिम, सलमान शेख मेहमुद काकर या तरूणांसह काही नातेवाईक जिल्हा रूग्णालयात रिक्षातून आले होते. रिक्षातून उतरल्यानंतर रूग्णालयात जात असताना मागून दहा ते पंधरा तरूण हे मोटारसायकलीवरून आलेल्या तरूणांनी तिघा तरूणांना रस्त्यातच अडवून काहीन बोलता त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्यावर हल्ला चढविला. तिघांवर धारधार शस्त्राने देखील वार केले. यात त्यांच्या डोक्यावर व चेहर्‍यावर ईजा झाल्याने सुलेमान, सलमान व गुड्डु हे तिघे रक्कबंबाळ झाले होते. या घटनेमुळे जिल्हा रूग्णालयात पळापळ सुरू झाली होती.

डॉक्टराला केली धक्काबुक्की
तिघा तरूणांना मारहाण करणार्‍या युवकांनी जिल्हा रूग्णालयात प्रवेश करत तेथे देखील धतिंग केली. गोंधळ घालू नका अन्यथा पोलिसांना बोलवावे लागेल असे सीएओ डॉ. प्रविण बोदडे यांनी बोलताच त्यांनी युककांनी त्यांना देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. पोलिसात तक्रार देईल असे पुन्हा बोलल्यावर युवकांनी त्यांना ओढाताण करून मारहाण करत गोंधळ घातला. त्यानंतर युवकांनी तेथून काढता पाय घेतला. डॉ. बोदडे यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठत युवकांबाबत तक्रार दिली.

घाबरलेला युवक लपून बसला खाजगी रूग्णालयात
सुलेमान, सलमान व गुड्डु यांच्यासोबत सलमान शेख शकी (14) हा युवक देखील तनीजा बी यांना पाहण्यासाठी आला होता. परंतू, मोटारसायकस्वार तरूणांनी अचानक हल्ला करत त्या तिघांसह सलमान शेख शकीर यास देखील बेदम मारहाण केली. त्याने कसे-बसे तेथून पळ काढला. जिल्हा रूग्णालयाच्या शेजार्‍या गल्लीतून पळ काढत असताना काही तरूणांनी त्याचा पाठलाग केला. आपल्याला आणखी मारतील या भितीपोठ चक्क एका खाजगी रूग्णालयात जावून सलमान शेख शकीर या युवक तिसर्‍या मजल्यावर जावून तासभर लपून राहिला. पोलिसांना युवकाबाबत माहिती मिळताच त्यांनी खाजगी रूग्णालयाकडे धाव घेत त्यास बाहेर काढले व घटनेची संपूर्ण माहिती विचारली.

वेगवेगळे कारणे आली समोर
जिल्हा रूग्णालयात घडलेल्या घटनेचे वेगवेगळी कारणे समोर येत होती. यात रविवारी सकाळी रिक्षा व दुचाकीचा अपघात होवून हाणामारी झाली होती. त्यातुनच सायंकाळी या तिघा तरूणांना मारहाण केल्याचे काहींकडून म्हटले जात होते. तर रिक्षाचा कट लागल्याच्या कारणावरून एका तरूणाला मारहाण झाली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी या तरूणांना मारहाण झाल्याचे म्हणण्यात आले. गैरसमजातून मारहाण झाल्याचेही म्हटले जात होते. अद्याप या घटनेचे मुख्य कारण समोर आले नाही.