ठाणे : बुधवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध करत रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांसह शेकडो कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांचे फार हाल झाले. रुग्णालयात खाजगी सुरक्षारक्षक पूर्वीप्रमाणे नेमण्याबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन देण्यात आले. इमर्जन्सी विभाग मात्र निदर्शनात सहभागी झाला नव्हता.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण करणाऱ्या आरोपींवर तत्काळ कारवाई करा, पूर्वीप्रमाणे रुग्णालयात खाजगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करा, जिल्हा रुग्णालय समिती गठीत करा व रुग्ण सोबत दोन नातेवाईकांना प्रवेश या नियमाची अंमलबजावणी करा अशा मागण्या करीत डॉक्टरांसह रुग्णालय कर्मचाऱ्यांनी काल्या फिती लावून निदर्शने केली. सकाळी ९ ते साडेबारा वाजेपर्यंत रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील कामकाज पूर्णत: ठप्प झाले होते. यावेळी मॅग्मा या डॉक्टरांच्या संघटनेचे माजी सचिव डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत रुग्णालय प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालक रत्ना रावखंडे यांनी निदर्शने करणाऱ्या रुग्णालय कर्मचाऱ्यांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पीपाटील, डॉक्टरांच्या संघटनेचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी चारही मागण्या त्वरित पूर्ण करण्याचा आग्रह धरला. यावेळी त्यांना रुग्णालयात खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करून सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले. सुमारे तीनशे डॉक्टर, सिस्टर्स, वॉर्ड बॉय व अन्य कर्मचारीही या निदर्शनात सहभागी झाले होते. यावेळी उपसंचालक रावखंडे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सेवेचा व सुरक्षा व्यवस्थेबाबत संबंधितांना सूचना केल्या.