सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांकडून हल्ला
रायपूर : छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफची एक छावणी माओवाद्यांनी उडवून दिली. ही छावणी काही महिन्यांपूर्वीच रिकामी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या दौर्याच्या केवळ काही तास आधी हा हल्ला झाला. हे ठिकाण मोदी यांच्या कार्यक्रमस्थळापासून केवळ 150 किमी अंतरावर आहे. आयईडीच्या साहाय्याने माओवाद्यांनी ही छावणी उडवून दिली.
पंतप्रधानांच्या दौर्याला विरोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिजापूर भेटीचा माओवाद्यांनी विरोध केला होता. लोकांनी त्यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहू नये यासाठी प्रयत्नही केले होते. बिजापूर जिल्ह्यातील काही खेड्यांमध्ये मोदी परत जा असे लिहिलेली पत्रके सापडली आहेत. सीआरपीएफचे प्रवक्ते दिनकरन मोजेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफने ही छावणी सहा महिन्यांपूर्वी रिक्त केली होती. ती उडवण्यासाठी माओवाद्यांनी आयईडीचा वापर केला आहे. सुकमामधील बोरगुडा येथे ही घटना पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये सीआरपीएफने ही छावणी सोडून तिचा ताबा जिल्हा प्रशासनाकडे दिला होता. त्यानंतर सीआरपीएफने आपला तळ जिल्ह्यात इतरत्र हलवला होता. तसेच याच दिवशी माओवाद्यांनी धर्मपेंटा आणि पेद्गुदाम रस्त्याच्या बांधकासाठी वापरल्या जाणार्या एका ट्रकलाही आग लावली. याच आठवड्याच्या सुरुवातीला माओवाद्यांनी आयईडीच्या मदतीने बिजापूर जिल्ह्यात एका बसला उडवले होते. या बसमध्ये डीआरजीचे जवान होते. या हल्ल्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला तर चार जवान जखमी झाले होते.