श्रीनगर : जम्मू कश्मिरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) च्या ताफ्यावर सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार सीआरपीएफ जवानांच्या वाहनांचा ताफा पंथा चौकाजवळून जात असताना काही बंदूकधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर लष्कराने संपुर्ण परिसराची नाकेबंदी केली असून कसून तपास सुरू केला आहे.
सीआरपीएफचे जवान महामार्गावर गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, साधारण दुपारी साडेतीन वाजता पंथा चौक परिसरात गोळीबाराचा जोराचा आवाज ऐकू येत होता. हल्ल्यात जवानांना गंभीरस्वरूपाची दुखापत झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले. सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांकडून अद्याप या हल्ल्यात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या हल्ल्यापुर्वी एकच दिवस अगोदर श्रीनगरच्या नौहटा परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलिस दलाचा जवान शहिद झाला होता तर 11 जण गंभीर जखमी झाले होते.