जळगाव । जिल्ह्याला घरकुल व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठे लक्ष देण्यात आले आहे. लक्षपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे कामकाज सुरु आहे. नवनियुक्त जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी 3 रोजी याबाबत बैठक जिल्हा विकास यंत्रणा कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्याभरातील कामकाजाचा आढावा घेतला. पंतप्रधान आवास योजना, शबरी, रमाई, पारधी आवास योजनेअंतर्गत झालेल्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला.
राज्यात घरकुल योजना राबविण्यात जळगाव जिल्हा अव्वल
यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विक्रांत बागडे उपस्थित होते. घरकुल योजनेचे हफ्ते थकित झाल्याची तक्रार होत आहे मात्र घरकुल योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले असून त्यानंतर ऑनलाईन पध्दतीनेच लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा हा राज्यात घरकुल योजना राबविण्यात अव्वल असून नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. 2015-16 चे घरकुल योजनेअंतर्गत 60 टक्के कामे पुर्ण झाले आहे. जळगाव तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 844 घरकुले मंजुर असून 474 लाभार्थ्यांना पहिला हफ्ता देण्यात आला आहे. 593 लाभार्थी योजनेच्या अनुदानासाठी पात्र असल्याची माहिती प्रकल्प संचालक विक्रांत बागडे यांनी दिली.