सीईओंनी सर्व शासकीय योजनांचा घेतला आढावा

0

जळगाव। जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सर्व शासकीय योजनांचा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आढावा घेतला. मंगळवारी 18 रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात समन्वय बैठक घेण्यात आली होती. यावेळी घरकुल, स्वच्छ भारत योजना, दलित वस्ती सुधार योजना, अर्थ विषयक योजना, जलयुक्त, आरोग्य, शुध्द पाणी पुरवठे विषयी समन्वय समितीत आढावा घेण्यात आला. शासनाच्या अग्रक्रमावरील योजनांचा विशेष करुन यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

निकृष्ट आहार स्विकारु नका
जिल्ह्याभरात निकृष्ट पोषण आहार पुरवठा सुरु असल्याची तक्रार आहे. संपुर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये पोषण आहार चौकशी सुरु असून अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येत आहे. पुरवठादाराकडून पुरविण्यात येत असलेले धान्यादींची तपासणी करुन घ्यावी, जर निकृष्ट पोषण आहार आढळून आला तर स्विकारु नये असे आदेश देण्याचे जिल्हा समन्वय समिती बैठकीत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सुचना करण्यात आले आहे. निकृष्ट पोषण आहार स्विकारल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच धान्यादीं स्विकारतांना पुरवठादाराकडून लेखी घेण्यात यावे अशाही सुचना करण्यात आल्या.