मुख्यमंत्री नुसते नादी लावताहेत; 5 प्रज्ञाचक्षूंचा मुख्यमंत्री कार्यालयासमोर ठिय्या
मुंबई (निलेश झालटे):- जन्मतः अंध असलेले पाच बांधव मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाच्या समोर कठड्यावर बसलेले दिसून आले. अंध असून भीक न मागता आपल्या परीने जमेल तो व्यवसाय करून पोट भरणारे हे पाच जण स्थायी घरासाठी भूखंड मिळावा अर्थात जगता यावे यासाठी निवारा मिळावा याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाच्या पायर्या झिजवत आहेत. इतक्या दुरून चार-पाच वेळा येऊनही मुख्यमंत्री न भेटल्यामुळे हताश होऊन सहाव्या मजल्यावर कार्यालयासमोर हताश होऊन बसले होते. ’कुणी घर देता का घर’ हा नटसम्राट मधील संवाद या क्षणी आठवला. मात्र याचे शब्द मात्र वेगळे होते, ‘सीएम साहेब, अंध बांधवांना घर देता का घर…!’. अशा भवना मांडत या दृष्टीहीनांनी सोमवारी मुख्यमंत्री कार्यालयासमोर ठिय्याच मांडला होता.
अशी आहे. कर्मकहानी
हे पाचही प्रज्ञाचक्षु विदर्भातून आले होते. दत्तात्रय डाहिरे ऑर्केष्ट्रा ग्रुपमध्ये काम करतात. ते मुळचे वाशीमचे. विशाल राऊत हा रोहटेक, यवतमाळचा. एकनाथ अमझरे अमरावती जिल्ह्यातील वासनी बुजरूक येथील. तर गजानन राठोड व रमेश चरडे हे दोघेही अमरावतीचे. कुणी रेल्वेत खेळणी विकते तर कुणी मसाज करून देतेय. जगण्याचा प्रचंड संघर्ष असताना देखील हे सगळे आपली जीवनचर्या स्वाभिमानाने चालवीत आहेत. दृष्टिहीन बेरोजगार हा वर्गात मोडणारे हे लोक स्थायी निवासासाठी संघर्ष करत आहेत.
मुख्यमंत्री टाळत आहेत
आम्ही घर मिळावं यासाठी चार-पाच वेळा मंत्रालयात आलो आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आम्ही अर्ज केला असून अमरावतीमध्ये गटाच्या यादीत नाव देखील आले असल्याचे राठोड यांनी सांगितले. यासंदर्भात गेल्या चार वर्षांपासून भूखंड मिळावा यासाठी पाठपुरावा करत असून स्थानिक प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने कंटाळून या पाच जणांनी मंत्रालय गाठले. मुख्यमंत्री कार्यालयात इतक्या दुरून येऊन देखील मुख्यमंत्र्यांना भेटून दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. निराधारांच्या विकासाच्या गोष्टी करणारे मुख्यमंत्री आम्हाला टाळत आहेत अशा शब्दात पाचही जणांनी ‘जनशक्ति’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
टोलवाटोलवीने त्रास होतोय!
खेड्यापाड्यातून आलेले अंध बांधव अमरावती कॅम्प रोड वर भाड्याने घर घेऊन राहतात. योजनेत जटिल अटी घालून योजनेपासून वंचित ठेवले असल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे. आम्ही त्रास सहन करून इतक्या दुरून मुंबईत आलो. मात्र इथेही आम्हाला खूप त्रास सोसावा लागला. बाहेरून आत येण्यापासून हा त्रास सुरू झाला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर तासनतास बसून देखील मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचे निवेदन पोहोचू दिले जात नाही. आम्हाला भेटू दिले जात नाही असे या दृष्टिहीन बांधवांचे म्हणणे आहे.