सीबीआयचे आणि सरकारचे अंतिम लक्ष्य मीच आहे -पी. चिदम्बरम

0

नवी दिल्ली । माझ्या निर्णयांमध्ये मी कोणाचा दबाव सहन करीत नाही. मग कुटुंब असो किंवा कुणीही. त्यामुळे ‘आयएनएक्स मीडिया’तील परकी गुंतवणुकीबाबत माझा मुलगा कार्ती याच्यावर सीबीआयने नोंदविलेला गुन्हा धडधडीत खोटा आहे. त्याच्या आडून मला लक्ष्य करण्याचे कारस्थान आहे,’ असा आरोप माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी केला. सीबीआयने छापे घातल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी चिदम्बरम यांनी खुलासा केला. रझव्र्ह बँकेचे गव्हर्नर बनलेले डॉ. डी. सुब्बाराव आणि स्पर्धात्मक आयोगाचे अध्यक्ष बनलेले अशोक चावला हे त्या काळात परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे (एफआयपीबी) अध्यक्ष होते. दहा लाखांचा गैरव्यवहार केल्याचा गरळ ओकणारा आरोप करून या दोघांसह भारत सरकारच्या एकूण सहा प्रथितयश सचिवांची मानहानी सीबीआय व सरकारने केली आहे. माझ्या निर्णयांवर कुटुंबच काय.. कोणीही दबाव आणू शकत नाही. कोणत्याही सरकारी कामांवर प्रभाव टाकण्याची अथवा अधिकार्‍यांशी माझ्या परस्पर बोलण्याची मुभा मी कुटुंबीयांना कधीच दिलेली नाही. त्यामुळे कार्तीने ‘एफआयपीबी’शी संबंधित असलेल्या अधिकार्‍यांची कदापि भेट घेतलेली नाही. आयएनएक्स मीडिया/ न्यूज आणि ‘अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्सलटिंग’शी त्याचा संबंध नसल्याचे मी निक्षून सांगतो. कार्ती व त्याच्या उद्योगक्षेत्रातील मित्रांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असला तरीही तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचा सल्ला मी दिला आहे.

कार्ती, त्यांची चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी, त्यांच्याशी संबंधित असलेल्या अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्सलटिंग कंपनीच्या पद्म विश्वनाथन, ‘आयएनएक्स मीडिया’चे संचालक पीटर व इंद्राणी मुखर्जी यांची नावे त्यात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, स्वत: चिदम्बरम यांचे आणि त्या कालावधीत परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे (एफआयपीबी) सदस्य असणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे आरोपींच्या यादीत नाहीत. गुन्हेगारी स्वरूपाची फसवणूक, बेकायदा पद्धतीने लाभ घेणे, सरकारी अधिकार्‍यांवरील प्रभावाचा गैरफायदा घेणे आदी प्रमुख आरोप आहेत. एकेकाळी माध्यम व्यवसायात बडे प्रस्थ असलेले पीटर व इंद्राणी हे दोघेही सध्या पहिल्या लग्नापासून झालेली इंद्राणीची मुलगी शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत आहे.

कार्ती आणि त्याच्या मित्रांना लक्ष्य
‘छापे टाकल्यानंतरही मी संयम बाळगला. माझ्या कुटुंबासही संयत प्रतिक्रियांची सूचना केली. पण गेल्या दोन आठवडयंपासून माझ्या कुटुंबीयांबद्दल चेन्नईमधून नानाविध कंड्या पिकविल्या जात आहेत. मुख्य प्रवाहातील काही माध्यमे आणि सामाजिक माध्यमांमध्ये मीठमसाला लावून उलटसुलट माहिती प्रसिद्ध होत असल्याने मला खुलासा करणे भाग पडले आहे,’ असे सांगून चिदम्बरम म्हणाले, ‘सीबीआयने नोंदविलेल्या प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) माझे नाव नाही. पण त्यांचे अंतिम लक्ष्य मीच आहे. मला अडकवण्यासाठी कार्ती आणि उद्योगक्षेत्रातील त्याच्या मित्रांना लक्ष्य केले जात आहे.’ आपल्या वडिलांच्या पदाचा व प्रभावाचा वापर करून कार्तीनी नियमबाह्य परकी गुंतवणूक केलेल्या ‘आयएनएक्स मीडिया’ची मदत केली आणि त्या बदल्यात स्वत:च्या बेनामी कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतल्याचा दावा सीबीआयचा आहे.

लाच घेतल्याचा आरोप हास्यास्पद
भारत सरकारचे सहा सचिव ‘एफआयपीबी’चे सदस्य असतात. कोणा एकाचा निर्णय नसतो. या ‘एफआयपीबी’ने शिफारस केलेल्याच प्रकल्पांना मी मंजुरी दिली असल्याचा दावा करून ते म्हणाले, ‘आयएनएक्स मीडियाला परकीय गुंतवणुकीची परवानगी दिल्याप्रकरणी दहा लाख रुपयांची लाच, तीही धनादेशाने घेतल्याचा आरोप हास्यास्पद आहे.’ पण आरोप असलेल्या सर्व कंपन्यांशी कार्तीचा संबंध नसल्याचा दावा चिदम्बरम यांनी केला आहे, पण चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस या त्याच्या मालकीचा उल्लेख खुलाशामध्ये नाही.