नवी दिल्ली: सीबीआयमधील अंतर्गत संघर्ष शिंगेला पोहोचल्याने मोदी सरकारने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. यावरुन आता भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. माझे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहे. सीबीआयनंतर आता पुढची कारवाई अंमलबजावणी संचलनालयातील (ईडी) अधिकाऱ्यांवर होईल, असे सूचक विधानही स्वामी यांनी केले आहे.
सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला. या दोन्ही अधिकाऱ्यांना पदावरुन दूर करण्याची कारवाई सरकारकडून करण्यात आली. सरकारच्या या कारवाईवर सुब्रमण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली. सीबीआयपाठोपाठ ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच संपेल, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.
सीबीआय नरसंहारमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आता अंमलबजावणी संचलनालयातील अधिकारी राजेश्वर सिंह यांना निलंबित करणार आहेत, असा खळबळजनक दावा राज्यसभेतील खासदार स्वामी यांनी केला. ‘पीसीच्या विरोधात आरोपपत्र दाखल होऊ नये, यासाठी सीबीआय नरसंहार घडवणारे काहीजण ईडीच्या राजेश्वर यांचं निलंबन करतील असे घडल्यास माझ्या भ्रष्टाचारविरोधातील लढाईला काहीच अर्थ उरणार नाही. कारण माझं सरकारच भ्रष्टाचाऱ्यांना वाचवू पाहत आहे,’ असा गंभीर आरोप स्वामी यांनी म्हटले. स्वामी बहुतेकदा पी. चिदंबरम यांचा उल्लेख पीसी असा करतात. ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह सध्या चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत आहेत.