सीबीआय नव्हे, भाजपा ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन – ममता बॅनर्जी

0

नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हा अन्वेषणमधील (सीबीआय) भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सुरु असलेल्या कलहाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. रात्रीतून सीबीआयच्या संचालकांना हटवल्यावरुन देशात आता आरोपांची राळ उडाली आहे. भाजपानी घेतलेल्या या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निशाना साधला आहे. ममता यांनी सीबीआयला ‘भाजपा ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन’ अशी उपमा दिली आहे. ममता बॅनर्जींनी ट्विट करत सीबीआय आता बीबीआय (भाजपा ब्यूरो ऑफ इन्वेस्टिंगेशन) बनली आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. सरकारने वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यात एकमेकांवर सुरु असलेल्या लाचखोरीच्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने संयुक्त निर्देशक एम नागेश्वर राव यांच्याकडे पदभार दिला आहे. राव यांनी आज पदभार घेताच १३ अधिकाऱ्यांची बदली केली आहे. यात अस्थाना यांची चौकशी करणाऱ्या डेप्युटी एसपी अजय बस्सी यांचा समावेश आहे. बस्सी यांची पोर्ट ब्लेअर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.