जळगाव । चलनातील बंद नोटा बदली प्रकरणी जिल्हा बँक व जिल्हा परिषदेतील कर्मचारी रडावर असतांनाच शुक्रवारी 24 रोजी सीबीआय पथकाने जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभाग उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्या दालनात तीन तास कसुन चौकशी केली.
नंदु वाणी हे सीबीआयच्या रडावर असलेले जिल्हा परिषदेतील चौथे आहे. सीबीआयला अमळनेर न्यायालयातर्फे चौकशी आदेश प्राप्त झाले होते त्याअनुषंगाने ते चौकशीसाठी आले. गुन्हे अन्वेषण (सीबीआय)चे सात कर्मचारी दुपारी 3.30 वाजता जिल्हा परिषदेत दाखल झाले अधिकारी येताच जिल्हा परिषदेत सन्नाटा पसरला. नंदु वाणी हे गेल्या महिन्याभरापासून सुटीवर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयाची चौकशी करण्यात आली. वाणी रजेवर असल्याने त्यांच्या जागेवर कारभार पाहणारे राजन पाटील यांच्या उपस्थितीत बंदद्वार चौकशी करण्यात आली. जिल्हा बँकेतुन नोटा बंदी काळात तब्बल 73 लाख रुपयाचे चलनातुन बंद नोटा बदलुन दिल्याचा प्रकार उघडकीस आला. तक्रारीवरुन सीबीआय पथकांनी जिल्हाबँकेची चौकशी केली. दुसर्यांदा सीबीआयने जिल्हा परिषदेतील सुनिल सुर्यवंशी, नंदु पवार, भुषण तायडे या तीन कर्मचार्यांची चौकशी केली. या तीघांची मुंबई येथे देखील चोकशी झाली. त्यातील सुनिल सुर्यवंशी हे नंदु वाणी यांच्याच कार्यालयात कक्षाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे नंदु वाणी यांच्यावर देखील संशय घेण्यात आला होता. सीबीआयची जिल्हा परिषदेतील ही दुसरी चौकशी होती. सायंकाळी 6.15 वाजात चौकशी पथक जिल्हा परिषदेतुन रवाना झाले. सीबीआय पथक चौथ्यांदा जिल्ह्यात आले आहे.
घरी जाऊन केली चौकशी
नंदकुमार वाणी यांनी मुलाच्या लग्नानिमित्त रजेवर गेले होते. 10 मार्च पर्यत असलेली रजा त्यांनी नंतर आरोग्य विषयक कारणे देत वाढवुन घेतली. सीबीआय पथक त्यांच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेत दाखल झाली मात्र ते हजर नव्हते. ते हजर नसल्याने पथकाने सुरुवातीला जिल्हापरिषदेते चौकशी केली सायंकाळी 6.15 नंतर पथक त्यांच्या निवासस्थानी गेल्याचे समजते.
राजन पाटील यांनी माध्यमांना टाळले
नंदु वाणी हे सुटीवर असल्याने त्यांच्या जागी उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील हे कामकाज पाहत आहे. सीबीआय पथक चौकशीसाठी आली असता त्यांनी पाटील यांच्या समक्ष चौकशी केली. चौकशी आटोपल्यानंतर पथक जिल्हा परिषदेतुन निघुन गेले. पथकासोबतच राजन पाटील हे देखील निघाले त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलणे टाळले. चौकशीनंतर त्यांनी भम्रणध्वनी बंद केल्याचे आढळले
वाणी महिन्याभरापासून सुट्टीवर
उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदु वाणी हे त्यांच्या मुलाचे लग्न असल्याने 1 मार्च पासून सुटीवर होते. त्यांनी 10 मार्च पर्यत रजा घेतलेली होती. दरम्यान जिल्हा परिषदेतील तीन कर्मचार्यांची सीबीआय चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर देखील संशय घेण्यात आला त्यानंतर त्यांनी पुन्हा रजा वाढविल्याचे सांगितले जात आहे.. गेल्या महिन्याभरापासून ते सुटीवरच आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरिचेबल दाखवित होते.
कोण आहे नंदु वाणी
नंदकिशोर पुंडलीक वाणी हे जिल्हा परिषदेत गेल्या 10 ते 12 वर्षापासून कार्यरत आहे. वर्ग चारच्या कर्मचारी पदापासून ते कामकाज पाहत आहे. पदोन्नतीद्वारे ते जिल्हा परिषद सामान्य विभाग उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदावर पोहोचले.