10 वी, 12 वीचे फुटलेले पेपर पुन्हा घेणार
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) दहावीचा गणिताचा व बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन विषयांचे पेपर फुटल्यामुळे सीबीएसईने हा निर्णय घेतला असून, बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर मंगळवारी घेण्यात आला तर दहावीचा गणिताचा पेपर बुधवारी होता.
संकेतस्थळावर देणार माहिती
बोर्डाच्या काही परीक्षांदरम्यान गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. बोर्डाच्या परीक्षांची विश्वासार्हता व विद्यार्थ्यांशी प्रामाणिकपणा कायम राखत बोर्डाने बारावीचा अर्थशास्त्र व दहावीचा गणित विषयाचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची माहिती बोर्डाने एका पत्रकाद्वारे कळवली आहे. नवीन परीक्षांच्या तारखा लवकरच घोषित करण्यात येतील, असे सीबीएसईने सांगितलेे. याविषयी संपूर्ण माहिती एका आठवड्याच्याआत सीबीएसईच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. पाच मार्चपासून सुरू झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला यावर्षी 28 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसले आहेत.