नवी दिल्ली । सीबीएसई 12 वी परीक्षेचे निकाल 28 मे रोजी लागले होते. आता अनेक महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. याचदरम्यान आता एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पेपर तपासणीत गडबड झाल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्तानुसार पेपर तपासणीत बेजबाबदारपणा केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्यानंतर त्यांनी आपले पेपर पुनर्तपासणीसाठी पाठवले होते. पुनर्तपासणीनंतर मिळालेले गुण पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
400 टक्के वाढले
दिल्लीच्या एका विद्यार्थ्याला अर्थशास्त्रात फक्त 9 गुण मिळाले नंतर त्याला 45 गुण मिळाल्याचे आढळून आले. म्हणजेच सुमारे 400 टक्क्यांनी त्याच्या गुणांत वाढ झाली. दिल्लीच्याच एका विद्यार्थ्याचे कॉम्प्यूटर सायन्समधील गुण 67 वरून 94 पर्यंत गेले. सीबीएसईकडून यावर अजून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. आता सीबीएसईकडेही पुनर्तपासणीसाठी मोठ्याप्रमाणात अर्ज आल्याचेही या वृत्तात नमूद केले.